पुणे - लॉक डाऊनचा गैरफायदा घेत हँडवॉशची जादा दराने विक्री केल्याप्रकरणी बारामती एमआयडीसी येथील सिटी सेंट्रल मॉलचालक वैभव राजकुमार गांधी यांच्या विरोधात विविध कायद्यान्वये बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामतीत हँडवॉशची चढ्या भावाने विक्री, मॉल चालकावर गुन्हा दाखल
बारामतीच्या सिटी सेंट्रल मॉल येथे हॅण्डवॉशच्या मूळ किमतीपेक्षा ज्यादा दराने विक्री होत असल्याची तक्रार एका ग्राहकाने तहसील कार्यालयाकडे केली होती. याप्रकरणी पोलिसांनी सदर मॉल चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
जळोची गावचे तलाठी प्रदीप सदाशिव चोरमले यांनी याबाबत फिर्याद दिली. ही घटना १ एप्रिलची असून सदर मॉलमध्ये हॅण्डवॉशच्या मूळ किमतीपेक्षा ज्यादा दराने विक्री होत असल्याची तक्रार एका ग्राहकाने तहसील कार्यालयाकडे केली होती. त्यानुसार तहसीलदारांनी चोरमले यांच्यासह काटेवाडीचे तलाठी महेश मेटे यांना यांसंबंधी कारवाईचे आदेश दिले होते. या दोघांनी बनावट ग्राहक बनवून मॉलमध्ये जाऊन सदर हँडवॉशची तपासणी केली. यावेळी किमतीमध्ये खाडाखोड केली असल्याचे लक्षात आले. याबाबत विचारणा केली असता वरूनच तसे आले असल्याचे सांगण्यात आले. मूळ १८९ रुपये किमतीचे दोन हँडवॉश चोरमले यांनी खरेदी केले. त्याचे २८० रुपयांचे बिल ही देण्यात आले.
लॉक डाऊन दरम्यान अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार होणार नाही. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होणार नाही. याची प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. मात्र, लॉकडाऊनचा गैरफायदा घेत लहान मोठ्या दुकानदारानंसह मोठमोठे मॉल चालकही अत्यावश्यक वस्तूंची जादा दाराने विक्री करत असल्याच्या तक्रारीवरून सदर मॉल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.