पुणे -भाजपमध्ये प्रवेश होत असलेल्या घडामोडींवर भाष्य करणारे फलक पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य चौकात लावण्यात आले आहे. अद्याप मात्र हे फलक कोणी लावले आहे, हे समजू शकलेले नाही. सध्या भारतीय जनता पक्षात जोरदार इनकमिंग सुरू आहे. याच्यावर निशाणा साधणारे हे फलक आहे.
फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत असल्याने हा चर्चा विषय बनला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी भाजप तपास यंत्रणेचा धाक दाखवून पक्षप्रवेश करवून घेत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रविवारी पुण्यात बोलताना केला होता. खास करून यात ईडी आणि सीबीआय या संस्थांचा वापर केला जात असल्याचे पवार यांनी नमूद केले होते. हसन मुश्रीफ यांनी पक्ष प्रवेश करण्यास नकार दिल्यानंतर इनकमी टॅक्सची रेड पडली होती, अशी चर्चा राजकीय क्षेत्रात आहे.
फलकावर नेमकं आहे काय ?
भाजपात प्रवेश देणे आहे...पहिल्या ओळीत ईडी व इन्कम टॅक्स नोटीस आलेल्यांना प्राधान्य. तर दुसऱ्या ओळीत भ्रष्टाचार अनुभव असल्यास पहिली पसंती, असा टोला या फलकाद्वारे भाजपला लगावण्यात आला आहे. तिसरी ओळीत सहकार क्षेत्र बुडवल्याचा अनुभव हवा असा खोचक टोला देखील लागवण्यात आला आहे. फलकावर टीप देखील देण्यात आली असून विचारधारेची कुठलीही अट नाही, असे नमूद करण्यात आले आहे.
आमच्याकडील जागा फुल झाल्यास मित्र शाखेत अॅडजस्ट करता येईल, अशी मित्र पक्ष शिवसेनेची खिल्ली उडवण्यात आली आहे. प्रवेशासाठी त्वरित संपर्क साधा असे म्हटले आहे. मित्र पक्ष शिवसेनेत देखील अनेकांनी प्रवेश केला आहे त्यामुळे या फलकावर 'मित्र शाखेत' असा उल्लेख त्यांचा करण्यात आला आहे. हा फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत असल्याने हा चर्चा विषय बनला आहे. नेमके हे फलक लावले कोणी असा प्रश्न सर्वांना पडला आहे.