पुणे -शहरातली रुग्णसंख्या आटोक्यात आली असली, तरी ग्रामीण भागात अजूनही कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. हे लक्षात घेता पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर जायला नागरिकांना बंदी असणार आहे. पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद आणि पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे.
पर्यटन स्थळांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश -
जिल्ह्यातील ग्रामीण भागात नयनरम्य अशी पर्यटने स्थळे आहेत. पावसाळ्यात दंड किल्ल्यांसह या पर्यटन स्थळांवर पर्यटक गर्दी करत असतात. पण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी, ग्रामीण पोलीस आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावतीने काही बंधने घालण्यात आली आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुणे जिल्ह्याबाहेरील नागरिकांना पुण्यातील पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 'पुण्यातील पर्यटनस्थळांची यादी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवली आहे. पर्यटन स्थळांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश काढण्यात येणार आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पोलीस सुरक्षा आणि बॅरिकेड लावण्यात येणार आहेत. खोपोली, तळेगाव, खेड, मंचर, नारायणगाव व जिल्ह्यातील इतर हायवेवरील दर्शनी भागात फ्लेक्स लावण्यात येणार आहेत. त्याठिकाणी पर्यटन स्थळांवर गर्दी टाळण्याच्या हेतूने बंदी घालण्यात आली आहे', असे त्यांनी म्हटले.
हेही वाचा - मनसुख हिरेन हत्या प्रकरण : माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्माला 28 जूनपर्यंत एनआयए कोठडी