पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये छट पूजा साजरी करण्यास बंदी
पिंपरी-चिंचवडसह पुण्यातही उत्तर भारतीय बांधवांच्या छट पूजा सणास महानगर पालिका प्रशासनाने परवानगी नाकारली असून यावर्षी छट पूजा सार्वजनिकरित्या साजरी होणार नाहीय. यासंबंधी दोन्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांनी पत्रक काढले आहे.
पुणे : पिंपरी-चिंचवडसह पुण्यातही उत्तर भारतीय बांधवांच्या छट पूजा सणास महानगर पालिका प्रशासनाने परवानगी नाकारली असून यावर्षी छट पूजा सार्वजनिकरित्या साजरी होणार नाहीय. यासंबंधी पत्रक दोन्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांनी काढले आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी छट पूजा करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच घरी कुटुंबासह छट पूजा सण साजरा करत असताना कोरोना संदर्भातील नियम पाळण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उत्तर भारतीय बांधवांना केले आहे.
- तलाव / नदी किनारी छटपुजेस होणारी गर्दी लक्षात घेता कोविड १९ मार्गदर्शक तत्त्वांचे विशेषत: समाजिक अंतर राखणे, इत्यादीचे पालन होणार नाही. त्या अनुषंगाने तलाव / नदी किनारी अथवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी छटपुजेस परवानगी देण्यात येणार नाही. त्यामुळे अशा ठिकाणी भाविक जमा होणार नाहीत, याची पोलीस विभागाने दक्षता घ्यावी.
- भाविकांनी छटपूजा घरगुती पद्धतीने साजरी करावी. खासगी जागेत / घरात सुद्धा छटपुजा करताना सामाजिक शारिरीक अंतर राखण्यात येईल, याची आयोजकांनी /नागरिकांनी खबरदारी घ्यावी.
- कोविड विषयक घ्यावयाची महत्त्वाची खबरदारी, संबंधित नियम याबाबत देखील उपायुक्त सहाय्यक आयुक्त / क्षेत्रिय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सातत्याने जनजागृती करायची आहे. तसेच या अनुषंगाने नियम भंग करणाऱ्यांवर, मास्क सुयोग्य पद्धतीने परिधान न करणे, रस्त्यावर थुंकणे, विना परवानगी कार्यक्रम आयोजित करणे, गर्दी करण्यांवर दंडात्मक कारवाई उपायुक्त/ सहाय्यक आयुक्त / क्षेत्रिय अधिकारी व पोलीस प्रशासन यांनी नियमितपणे करायची आहे.
- यापूर्वी वेळोवेळी परवानगी देण्यात आलेले सर्व उपक्रम, त्यासाठी निर्गमित केलेल आदेश व मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील आदेशापर्यंत सुरू राहतील.
- संदर्भिय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.
- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने यापूर्वी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. कोवीड-१९ च्या प्रतिबंधासाठी या कार्यालयाद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे, मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारा व्यक्ती, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ अन्वये दंडनिय अपराध केला, असे समजून कारवाईस पात्र राहील.