महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बांग्लादेशी घुसखोर दाम्पत्याचा तुरुंगातच मुक्काम! वेश्या व्यवसायासाठी करण्यात आली होती सक्ती... - balgladeshi Intruder couple journey pune

हे बांगलादेशी जोडपे भारतात कसे आले, याची कहाणी रंजक आहे. हे दोघेही बांगलादेशातील खुलना जिल्ह्यातील रहिवासी आहेत. दोघानाही तीन मुलं आहेत, घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे काम मिळवून काही पैसे कमावता येतील, या उद्देशाने त्यांनी भारतात देण्याचे ठरवले.

balgladeshi Intruder couple journey to india pune
बांग्लादेशी घुसखोर दाम्पत्याचा तुरुंगातच मुक्काम

By

Published : Aug 8, 2021, 9:48 AM IST

Updated : Aug 8, 2021, 10:49 AM IST

पुणे -मोहम्मद आणि माजिदा मंडल बांगलादेशी दाम्पत्य मागील दोन महिन्यांपासून पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात राहत आहे. भारतामध्ये बेकायदेशीर घुसखोरी केल्याच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली होते. न्यायालयात त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले आणि त्यांना 2 वर्ष 3 महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यांची शिक्षा भोगून पूर्ण झाली. मात्र, त्यांच्या हस्तांतरणाची प्रक्रिया अजूनही पूर्ण झाली नाही. त्यामुळे मागील दोन महिन्यापासून ते फरासखाना पोलीस स्टेशनमध्येच राहत आहे.

याबाबत ईटीव्ही भारत प्रतिनिधीने संबंधितांशी साधलेला संवाद

बांग्लादेशातून भारतात कसे आले?

हे बांगलादेशी जोडपे भारतात कसे आले, याची कहाणी रंजक आहे. हे दोघेही बांगलादेशातील खुलना जिल्ह्यातील रहिवासी आहेत. दोघानाही तीन मुलं आहेत, घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे काम मिळवून काही पैसे कमावता येतील, या उद्देशाने त्यांनी भारतात देण्याचे ठरवले. एका मित्राने त्यांना याकामी मदत केली आणि 2019मध्ये ते अवैधरित्या भारतात घुसले.

सुरुवातीला पश्चिम बंगालमध्ये आणि नंतर रेल्वेने एक व्यक्ती त्यांना पुण्यात घेऊन आला. पुण्यात आल्यानंतर या दोघांनाही बुधवार पेठेतील एका घरात डांबून ठेवण्यात आले. मोहम्मद याला एका खोलीत डांबून ठेवलं आणि मोहम्मदला सोडायचं असेल तर वेश्या व्यवसाय करावा, यासाठी माजीदावर दबाव टाकण्यात आला. मात्र, माजीदाने वेश्याव्यवसाय करण्यास नकार दिला. त्यानंतरही त्यांना काही दिवस डांबून ठेवण्यात आले. मात्र, एके दिवशी जवळच असणाऱ्या पोलीस चौकीत माजीदा हिने धाव घेतली आणि तेथील पोलिसांना आपली आपबीती सांगितली.

भारतात बेकायदेशीररीत्या घुसखोरी केल्याच्या आरोपावरून या दोघांनाही पुण्याच्या फरासखाना पोलिसांनी अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर तिथे त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले आणि त्यांना 2 वर्ष 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. 16 जून 2021ला कारावासाची शिक्षा भोगून ते बाहेर आले. या दोघांना बांगलादेशात पोहचवण्यापर्यंतची प्रक्रिया पार पडेपर्यंत फरासखाना पोलीस ठाण्याच्या ताब्यात ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. तेव्हापासून हे दोघेही फरासखाना पोलीस ठाण्यातच राहत आहेत.

माजिदाची आपबीती -

आपली फसवणूक कशी झाली याविषयी सांगताना माजिदा म्हणाल्या, मला वडील आणि सासरे दोघेही नाहीत. आई, सासू, पती आणि तीन मुलांसह आम्ही राहत होतो. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे दोन पैसे कमावता येतील आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्याप्रकारे करता येईल, असा विचार करून एका दलालामार्फत आम्ही भारतात आलो. मात्र, इथे आल्यानंतर आमची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर दोन वर्ष आम्ही तुरुंगात होतो. दोन वर्षापासून माझे आणि मुलांचे बोलणे झाले नव्हते. मात्र, शिक्षा भोगून आल्यानंतर पोलिसांनी माझ्या मुलांसोबत व्हिडिओकॉल द्वारे बोलणं करून दिलं. आता कधी एकदा घरी जाईल याची आम्ही वाट पाहत आहोत.

हेही वाचा -विशेष : हुंडाबंदी कायद्याच्या साठीनंतरही महिलांचा छळ; लातूरमधील परिस्थिती काय?

मोहम्मदची आपबीती -

मोहम्मद म्हणतो, कपड्याच्या कंपनीत काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून बांगलादेशातील ओळखीच्या एका व्यक्तीने पश्चिम बंगालमध्ये तर दुसऱ्या एका व्यक्तीने पुण्यात आणले. इथे आल्यानंतर मला पोलिसांची भीती दाखवत माजीदाने वेश्या व्यवसाय व्यवसाय करावा यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आला. मात्र, त्यांच्या दबावाला आम्ही बळी पडलो नाही आणि हे काम करण्यास नकार दर्शवला. त्यानंतर काही दिवसांनी आम्हाला पोलिसांनी पकडला आणि तुरुंगात टाकले. आमची शिक्षा भोगूनही झाली आता आम्हाला लवकर घरी परत जायचे आहे.

फरासखाना पोलीस काय म्हणाले?

फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशानुसार मागील दोन महिन्यांपासून दोघेही येथे राहत आहे. त्यांना बांगलादेशात परत जाता यावे, यासाठी आम्ही बांगलादेश दूतावासासोबत पत्रव्यवहार केला आहे. मात्र, त्यांच्याकडून आम्हाला अजून याबाबत कुठलेही उत्तर आले नाही. या दोघांच्या मूळ गावाचा पत्ता आणि काही कागदपत्रे आम्ही मिळवली आहेत. आम्ही सातत्याने बांगलादेश दूतावासाच्‍या संपर्कात असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लवकरच त्यांना त्यांच्या देशात पाठवले जाईल. मोहम्मद आणि माजीदा या दोघांनाही आता आपल्या घरी जाण्याची, आईला, मुलांना भेटण्याची आस लागली आहे. घराची आठवण आल्यानंतर दोन्ही भावूक झाले. मुलांविषयी विचारले असता माजीदा यांना आपल्या डोळ्यातील अश्रू थांबवता आले नाही.

Last Updated : Aug 8, 2021, 10:49 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details