पुणे -देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी क्रांतीकारकांचे योगदान मोठे आहे. यातच भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या कार्याची दखल जागतिक पातळीवर घेतली जात असताना बालभारतीच्या आठवीच्या अभ्यासक्रमात भगतसिंग व राजगुरु यांचा उल्लेख करत सुखदेव यांचे नाव वगळून कुर्बान हुसैन यांचे नाव घेण्यात आले. हुसैन यांच्या नावाला विरोध नाही. मात्र, सुखदेव यांचे नाव वगळणे गैर आहे, असे म्हणत हुतात्मा राजगुरुंच्या जन्मभूमीत संताप व्यक्त केला जात आहे.
बालभारतीच्या आठवीच्या मराठी पुस्तकात ज्येष्ठ लेखक यदुनाथ थत्ते यांच्या लेखनाच्या संदर्भातून 'माझ्या देशावर माझे प्रेम आहे' या पाठात शाळेतील प्रार्थनेच्या वेळी विद्यार्थी देशाची प्रार्थना करुन जात असताना तुमच्या देशावर प्रेम कसे, या विषयावरील संवादावर पाठ देण्यात आला आहे. या पाठाच्या शेवटी म्हटले की, 'देशावर प्रेम करायचे तर भूमी व भूमीपुत्रांवर प्रेम करायला हवे', असे मत व्यक्त केले आहे. त्यावर मुलांनी 'भगतसिंग, राजगुरु व कुर्बान हुसैन हसत हसत फासावर गेल्याचे म्हटले आहे. यावर आता हुतात्मा राजगुरुंच्या जन्मभुमीतूनच विरोध होऊ लागला आहे. देशप्रेमासाठी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु या तिघांना इंग्रजांनी एकत्रित फाशी दिली, तर सुखदेव यांचे नाव वगळून हुसैन यांचे नाव पाठ्यपुस्तकात देऊन इतिहासांबरोबर यातून छेडछाड केली जात असल्याचे मत राजगुरुप्रेमींनी व्यक्त केले आहे.