पुणे - भाजप पराभवाच्या मानसिकतेत आहे. स्वतःचे आमदार टिकवण्यासाठी, मी पुन्हा येणार असे सांगावे लागत आहे. त्यावेळीही ते म्हटले होते मी पुन्हा येणार, पण आले नाही आणि यापुढेही येणार नाहीत, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपला लगावला आहे. एमआयएम ही भाजपचीच 'बी' टीम आहे. एनआरसी, सीएएचा वापर करुनही समाजात विभाजन होत नाही, हे पाहिल्यावर भाजपने ही नवी चाल खेळली असल्याचे थोरात म्हणाले. थोरात यांनी शुक्रवारी पुण्यातील काँग्रेस भवनला भेट दिली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
महाविकास आघाडी सरकारने तीन महिने पूर्ण केले आहेत. या काळात आम्ही पूर्वीच्या सरकारपेक्षा सरस निर्णय घेतले आहेत. शेतकऱ्यांचे कर्ज माफी केले. त्यांच्या खात्यात विनासायास पैसे जमा होणार आहेत. यासाठी त्यांना कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही. शिवभोजन थाळी, बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवली, 7/12 ऑनलाईन, असे अनेक चांगले निर्णय या सरकारने घेतले, अशी माहिती थोरात यांनी दिली.