मुंबई : रोजगाराची वाट पाहणाऱ्या सर्व बेरोजगार तरुणांना आज महाराष्ट्र सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. यासाठी बजाज फिनसर्व्ह आणि महाराष्ट्र सरकारमध्ये एक करार झाला आहे. या सामंजस्य करारातून बजाज फिनसर्व्ह ही कंपनी विद्येचे माहेर घर असलेल्या पुण्यात जवळपास ५ हजार कोटी गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीतून ४० हजार नोकर्या निर्माण होतील, अशी माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
कोणता प्रकल्प येणार : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांच्या उपस्थितीत हा करार झाला आहे. महाराष्ट्र सरकार आणि बजाज कंपनीच्या या सामंजस्य करारावर सरकारचे उद्योग सचिव हर्षदीप कांबळे आणि बजाज फिनसर्व्हचे मुख्य वित्तीय अधिकारी एस. श्रीनिवासन यांनी स्वाक्षरी केली. प्रकल्पावर काम 2023 मध्ये सुरू होणार आहे. व्यवसायासाठी अत्याधुनिक कनेक्टिव्हिटी आणि सुविधांची आणल्या जातील. या प्रगतीचा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सकारात्मक परिणाम होईल, कारण यामुळे पुणे आणि आसपासच्या तसेच जागतिक स्तरावर भागीदार, विक्रेते, पुरवठादार आणि कंत्राटदारांसाठी नवीन नोकऱ्या आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होतील, असे निवेदनात म्हटले आहे.
कुठे होणार प्रकल्प : महाराष्ट्र सरकारने बजाज फिनसर्व्हसोबत सामंजस्य करार केला आहे. त्याअंतर्गत नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी बजाज फिनसर्व्ह पुण्यात तब्बल 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. पुण्यातील मुंढवा येथे 19 एकर जागेत कंपनीच्या मुख्यालयाच्या कार्यक्षेत्रात सेवाप्रकल्प उभारला जाणार आहे. यामुळे राज्यात 40 हजार लोकांना रोजागार मिळणार आहे. या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर फडणवीस म्हणाले की, पुणे हळूहळू वित्तीय सेवांचे केंद्र बनत आहे आणि बजाज फिनसर्व्हच्या नवीनतम विकासामुळे या क्षेत्राला चालना मिळेल. मला वाटते की फिनटेक क्षेत्रात अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे.