पुणे- मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनादरम्यान चाकण येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना संशयित आरोपी ठरवण्यात आले होते. दिलीप मोहिते यांनी राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला. मात्र, त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. याच जामीन अर्जावर उच्च न्यायालयात अपिल करण्यात आले होते. त्यावर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रेवती डेरे-मोहिते यांच्या कोर्टाने दिलीप-मोहितेंचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रेवती डेरे-मोहिते यांच्यासमोर मोहिते यांच्या बाजूने त्यांचे वकील अँड. मनोज मोहिते, तपन थत्ते यांनी युक्तिवाद केला तर, सरकारच्या बाजूने सरकारी वकील श्रीकांत गावंड यांनी युक्तिवाद केला. दोघांचेही म्हणणे ऐकून घेतल्यावर आज निर्णय देत न्यायालयाने दिलीप मोहिते यांचा अटकपुर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे.