पुणे:नुकतेच काँग्रेसचे नेते माजी खासदार राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांचे खासदारकी पद रद्द करण्यात आले आहे. देशभरात या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या विरोधात जोरदार आंदोलने केली जात आहेत. अश्यातच राज्यात देखील आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने, दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यांची देखील आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
दिव्यांगांसाठी आंदोलन केल्याने शिक्षा? युवक काँग्रेसच्या मागणीच्या विरोधात आज पुण्यातील बालगंधर्व चौकात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून आमदार बच्चू कडू यांच्या प्रतिमेला दुग्धभिषेक घालण्यात आला. तसेच त्यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. उत्साही कार्यकर्त्यांकडून आमदार कडू यांना 'अपंग हृदयसम्राट' ही पदवी देण्यात आली. यावर प्रहार संघटनेचे नेते संतोष साठे म्हणाले की, आमचे नेते बच्चू कडू यांनी नाशिक महापालिका येथे दिव्यांग नागरिकांसाठी आंदोलन केले होत म्हणून त्यांच्यावर शिक्षा देण्यात आली आहे. आजवर राज्यात सर्वाधिक गुन्हे दाखल झालेले आमदार हे बच्चू कडू असून राष्ट्रवादी जी मागणी करत आहे त्याला काहीही अर्थ नाही. दिव्यांगांसाठी आंदोलन करणारा आमचा नेता असल्याचे यावेळी साठे यांनी सांगितले आहे. यावेळी करण्यात आलेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली.