पुणे- ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचं वयाच्या 89 वर्षी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर शुक्रवारी 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. बाबा माहाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी तीननंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ठेवण्यात येईल.
बाबा महाराज सातारकर यांनी आपलं आयुष्य अध्यात्माच्या प्रचार, प्रसारासाठी अर्पण केलं. रोखठोक वाणी आणि शुद्ध विचार हे बाबा महाराज सातारकर यांचं व्रत होतं. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचं प्रबोधन केलं. यावर्षीच्या सुरुवातीलाच फेब्रुवारी महिन्यात बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रूक्मिणी ऊर्फ माई सातारकर यांचं निधन झालं होतं. त्यानंतर 8 महिन्यानंतर बाबा महाराज सातारकर यांचीही प्राणज्योत मालवली. कीर्तन कलेतून घरोघरी अध्यात्माचा प्रचार करण्यात बाबामहाराज सातारकर यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जाते. त्यांचे कीर्तनाचे कार्यक्रम गावोगावी लोकप्रिय झाले. ग्रामीण भागात भागवत सप्ताहांमध्ये बाबामहाराज सातारकर यांच्या प्रवचनाकरिता प्रचंड मागणी असायची. विनोदी आणि खुमासदार शैली ही त्यांची प्रवचनाची खासियत होती.
वकिलीचं पदवीपर्यंतचे शिक्षण-संपूर्ण महाराष्ट्रात बाबा महाराज सातारकर म्हणून परिचित असलेले बाबा महाराज यांचे मूळ नाव हे नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे होते. त्यांचा जन्म हा साताऱ्यातील गोरे सातारकर घराण्यात ५ फेब्रुवारी १९३६ ला झाला. त्यांच्या घराण्यातून तीन पिढ्यांपासून सुरू असलेला कीर्तन व प्रवचनाचा वारसा मिळाला. असे असले तरी त्यांनी वकिलीचं पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलं. मात्र, त्यांना प्रवचनाची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे ते परंपरागत प्रवचन आणि कीर्तनाकडं वळाले. त्यांची हरिविजय, भक्तिविजय ग्रंथावरील प्रवचने वारकरी संप्रदायात लोकप्रिय आहेत.
अनेक पुरस्कारांनी सन्मानित-मुंबई, पुणे, पिंपरी, चिंचवड, सासवड, पैठण, अक्कलकोट, नागपूर, सोलापूर या नगरपालिकेतर्फे आणि महानगरपालिकांतर्फे त्यांना नागरी सत्कारानं सन्मानित करण्यात आलं. श्री देवदेवेश्वर संस्थान, सारसबाग, पुणे, पुणे विद्यापीठ नामदेव अध्यासनतर्फे पुरस्कार, महाराष्ट्र शासनातर्फे व्यसनमुक्ती पुरस्कार, कार्यगौरव पुरस्कार, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती टस्ट, तिसरी जागतिक मराठी परिषद नवी दिल्ली या पुरस्कारांनी बाबा महाराज सातारकर यांना सन्मानित करण्यात आलं. विक्रमी कीर्तन कॅसेट विक्री बाबत राज्यपालांच्या हस्ते प्लॅटिनम डिस्क देऊन 'सरगम कॅसेट'च्या वतीने गौरवलेले पहिले कीर्तनकार महाराज अशीदेखील त्यांची ओळख आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली-ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांनी महाराष्ट्राची विठ्ठल, ज्ञानेश्वर भक्तीची परंपरा, वारकरी सांप्रदायाचा वारसा समर्थपणे पुढे नेला. साध्या, सोप्या, रसाळ, ओघवत्या वाणीतल्या किर्तनांनी महाराष्ट्राचं प्रबोधन केलं. प्रबोधनाच्या चळवळीतून अज्ञान, अनीती, अंधश्रद्धेसारख्या कुप्रथांविरुद्ध लढा दिला. त्यांच्या किर्तनांनी व्यसनमुक्तीच्या लढ्याला बळ मिळालं. राज्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक क्षेत्रात बाबा महाराजांचं स्वतंत्र स्थान होतं. त्यांचं निधन ही महाराष्ट्राच्या आध्यात्मिक, प्रबोधनाच्या चळवळीची मोठी हानी आहे. बाबा महाराजांच्या कुटुंबीयांच्या, अनुयायांच्या दु:खात आम्ही सर्व सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांना श्रध्दांजली वाहिली आहे.
आमदार संजय केळकर यांची श्रद्धांजली-बाबामहाराज सातारकर यांच्या दुःखद निधनाने वारकरी संप्रदायामध्ये कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. बाबामहाराज सातारकरांनी महाराष्ट्रभर कीर्तने केली. 'ज्ञानोबा माऊली' हा जय घोष त्यांच्या मुःखातून ऐकताना रसिक, वारकरी तल्लीन व्हायचा. आपल्या आवाजाने त्यांनी सर्वाना मंत्र मुग्ध केले होते. अनेक सामाजिक विषयात, लोकांमध्ये जनजागृतीपर कीर्तने त्यांनी केली. अशा या वैशिष्ट्य पूर्ण समाजसेवकास कीर्तनकारास भावपूर्ण श्रद्धांजली...