पुणे - 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, की आमचे सरकार तीन चाकी असून मी ड्रायव्हर आहे. मात्र, अशीच तीनचाकी रिक्षा चालवणाऱ्याकडे त्यांचे लक्षच नाही. रिक्षा चालकांकडे सरकार कधी लक्ष देणार आहे? या प्रश्नाचे उत्तर मागण्यासाठी येथे आलो आहोत, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांनी व्यक्त केली. रिक्षा चालकांच्यावतीने विविध मागण्यांसाठी आज पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात संप करण्यात आला आहे.
'सरकार तीनचाकी, मात्र तीन चाकीवाल्यांकडेच दुर्लक्ष'; रिक्षा आंदोलनात बाबा आढावांची टीका - बाबा आढाव सरकार टीका
कोरोना लॉकडाऊनच्या काळात रिक्षातून प्रवासी वाहतूक बंद होती. यामुळे रिक्षा चालकांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. सरकारने जशी इतर व्यावसायिकांना मदत केली तशीच रिक्षा चालकांनाही करावी, अशी अपेक्षा चालकांची आहे.
रिक्षा पंचायतीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. रिक्षा चालकांसाठी तातडीने कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, लॉकडाऊनच्या काळात दरमहा 14 हजार वेतन मिळावे, चार महिन्यांचा विम्याचा 3 ते 4 हजार रुपये परतावा मिळावा, अशा विविध मागण्या रिक्षा पंचायतीच्यावतीने करण्यात आला.
कोरोनाच्या काळात रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय आमच्यावर लादला गेला आहे. सहा महिने झाले आमचे काम बंद आहे. त्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. जसे शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ केले असेच आमचेही गाड्यांचे कर्ज माफ झाले पाहिजे, अशी मागणी रिक्षाचालकांच्यावतीने ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांनी केली.