मावळ - पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये सेल्फी काढणं जिवावर बेतलं आहे. सेल्फी घेताना पाय घसरून एक 8 वर्षीय मुलगा पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी वडिल आणि मामाने पाण्यात उडी घेतली. या घटनेत मुलाचा मामा आणि वडिलांचा पाण्याच्या प्रवाहात बुडून मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दिली आहे. आयुष राकेश नरवडे असे वाचवण्यात आलेल्या 8 वर्षीय मुलाचे नाव आहे.
मृतांची नावे
तर, राकेश लक्ष्मण नरवडे (36 वर्षे) आणि वैष्णव विनायक भोसले (30 वर्षे) या दोघांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफने शोध घेतला असता कुंडमळ्याच्या पाण्याच्या प्रवाहात त्यांचा मृतदेह मिळून आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील कुंडमळ्यात सेल्फीच्या मोहापायी तिघेजण वाहून गेल्याची घटना घडली. यात 8 वर्षीय मुलाला वाचवण्यात स्थानिक नागरिकांना यश आले आहे. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली आहे. तर, अनेक पर्यटक नियम झुगारून पर्यटनस्थळी येत आहेत. गर्दी करत असून अशा घटनांना निमंत्रण देत आहेत. त्यामुळे जीवापेक्षी सेल्फी महत्त्वाचा नाही. सेल्फीचा मोह आवरावा, असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.
हेही वाचा -ऑनलाईन सेक्सचा मोह भोवला, व्यापारी 18 हजाराला डुबला