अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्तीवर पुणेकरांनी हातमागावर विणलेलं रेशमी वस्त्र पुणे Ayodhya Ram Mandir Inauguration : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची प्रतीक्षा सध्या सर्वांनाच लागली आहे. त्यातच हा सोहळा पाहण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. येत्या 17 जानेवारीपासून अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात होणार आहे. तसंच 22 जानेवारी रोजी मंदिराचा भव्य असा लोकार्पण सोहळा पार पडेल. तसंच बालअवस्थेतील असलेल्या श्री रामलल्लाच्या एकूण तीन मूर्ती तयार केल्या जाणार असून यासाठी जयपूरमधील मार्बल आणि कर्नाटकातील दोन ठिकाणाहून कृष्णशीला निवडण्यात आलीय. तसंच प्राणप्रतिष्ठापना होणाऱ्या श्रीरामांच्या मूर्तीचे वस्त्र हे खास पुण्यातून दिले जाणार आहे.
दो धागे श्रीराम के लिये :पुण्यातील अनघा घैसास यांच्या हँडलूम संस्थेकडून श्रीरामाचे वस्त्र तयार करण्यात आले आहे. तसंच ज्या भाविकांना श्री राम मंदिराच्या उभारणीमध्ये आपलं योगदान द्यावं वाटतंय, त्यांच्यासाठी 'दो धागे श्रीराम के लिये' हा खास उपक्रम राबवण्यात आलाय. 10 डिसेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात आला असून या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार जवळपास साडेनऊ लाख भाविकांनी या उपक्रमात सहभाग घेत श्री रामांचं वस्त्र विणण्याचं काम केलं.
सोन्या-चांदीच्या वस्त्रांचाही समावेश : यासंदर्भात अधिक माहिती देत अनघा घैसास म्हणाल्या की, पुण्यात तयार झालेलं हे वस्त्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते राम मंदिर ट्रस्टला देण्यात येणार आहे. तसंच या वस्त्रांमध्ये सोन्या-चांदीच्या जरीने तयार केलेल्या वस्त्रांचाही समावेश असणार आहे. परंतु, सर्वसामान्यांना सुद्धा यात सहभाग घेता यावा म्हणून प्रत्येकानं दोन धागे या ठिकाणी विणलेले आहेत. या वस्त्रांचा प्रभू श्रीरामांच्या पेहरावासाठी वापर करण्यात येणार आहे. तसंच या वस्त्रांसाठी शुद्ध रेशीम धाग्याचा वापर करण्यात आल्याचंही त्या म्हणाल्या.
उपक्रमात साडेनऊ लाख लोकांचा सहभाग :पुढं घैसास म्हणाल्या की, आतापर्यंत या उपक्रमात साडेनऊ लाख लोकांनी सहभाग नोंदवलाय. या उपक्रमामुळं रामाच्या चरणी माझे दोन धागे वाहता आले, सेवा करता आली ही भावना सर्वांच्या मनामध्ये आहे. तसंच सात दिवसांसाठी वेगवेगळ्या रंगांची वस्त्रं तयार करण्यात येणार आहेत, असंही अनघा घैसास यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- त्यामुळं ठाकरेंच्या सत्तेचं 'लंका'दहन, ठाकरे सरकार पाडण्यात माझा वाटा - मुख्यमंत्री शिंदे
- प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर आयोध्येत तयार करणार 5 हजार किलोंचा प्रसाद
- सचिन, विराट, अमिताभसह 50 देशाच्या प्रतिनिधींना राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण