बारामती -तत्कालीन समाजव्यवस्थेला झुगारून क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. समाजात पुरुषा इतकेच स्त्रीलाही महत्व आहे. हा विचार समाजात रुजविण्यासाठी सर्व वर्गातील महिलांना शिक्षित करण्यासाठी फुले दांपत्यांनी देशातील पहिली मुलींची शाळा पुणे येथे 1848 साली सुरू केली. याचाच परिपाक म्हणून आज 174 वर्षानंतर प्रत्येक वर्गातील महिला सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक, संरक्षण, औद्योगिकसह विविध क्षेत्रात महिला पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करत आपली वेगळी व स्वतंत्र ओळख प्रस्थापित करत असल्याचे दिसून येत आहे. सामाजिक जाणिवेतून बारामती येथील युवा चेतना फाउंडेशनच्यावतीने महाविद्यालयीन तरुणींकडून सामाजिक कामे सुरू आहे.
विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती -आपण ही समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून मानवासह निसर्ग व प्राणिमात्राची सेवा करण्याचे काम युवा चेतना सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे. बाल लैंगिक शोषण, प्राणिमात्र सेवा, एचआयव्ही एड्सबाबत जनजागृती, पक्ष्यांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था, गड किल्ले संवर्धन, स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम, पर्यावरण पूरक उपक्रम, अंधश्रद्धे बाबत जनजागृती आधी विषयांवर युवा चेतना संस्थेच्या महाविद्यालयीन तरुणी मागील दोन वर्षांपासून काम करीत आहेत. महाराष्ट्रातील जळगाव, जालना आधी जिल्ह्या बरोबरच पुणे जिल्ह्यातील बारामती, आंबेगाव, शिरूर, खेड, वेल्हे, हवेली, जुन्नर मधील तालुक्यातील शाळांमध्ये जवळपास 7 हजारांहून अधिक बाल विद्यार्थ्यांना चांगला स्पर्श, वाईट स्पर्श ओळखणे या गोष्टींबद्दल जनजागृती केली आहे. तसेच शिक्षक,पालक व तरुण वर्गाला या गोष्टीबद्दल माहिती देऊन जनजागृतीचे महत्व पटवून दिले जात आहे.
एचआयव्ही एड्स बाबत जनजागृती -युवा चेतना संस्थेतील या तरुणी समाजातील एचआयव्ही एड्स बाधित रुग्णांसाठी ही कार्य करीत आहेत.संस्थेच्या माध्यमातून या तरुणी एचआयव्ही बाधित रुग्णांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याबरोबरच त्यांना योग्य ती मदत करीत आहे.तसेच मागील दोन वर्षात तीन यशस्वी सेमिनार घेऊन एचआयव्ही बाबत जनजागृती मोहीम राबविली आहे.या सेमिनार मध्ये एचआयव्हीचे प्रसार माध्यमे तसेच घ्यावयाची काळजी व त्यावरील औषध उपचारांबाबत माहिती देण्याचे काम केले जात आहे.