पुणे - विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ कामगार नेतेबाबा आढाव यांच्या नेतृत्वाखालीरिक्षा पंचायत संघटना गेल्या काही दिवसांपासूनआंदोलन करत आहे. आज रिक्षा पंचायतीच्यावतीने टिळक रस्त्यावरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. रिक्षाचालकांनी हिराबाग चौक ते राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. काही दिवसांपूर्वी रिक्षा चालकांनी शिवसेनेच्या कार्यालयावर आंदोलन केले होते.
पुण्यात रिक्षाचालकांचे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलन - पुणे रिक्षा चालक आंदोलन न्यूज
लॉकडाऊन आणि कोरोनाची भीती यामुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय ठप्प आहे. विविध मागण्यांसाठी रिक्षा चालक आंदोलने करत आहेत. मात्र, शासनाचे त्यांच्याकडे लक्ष नाही.
![पुण्यात रिक्षाचालकांचे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलन Agitation](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9269227-883-9269227-1603351808229.jpg)
हमाल-कामगारांचे जसे महामंडळ आहे, तसेच रिक्षाचालकांचेही महामंडळ व्हावे, ही मागणी मागील अनेक दिवसांपासून होत आहे. कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांच्या काळात रिक्षाचालकांचे आर्थिक उत्पन्नही पूर्णपणे थांबले आहे. तीन पक्षांचे हे सरकार तीनचाकी रिक्षासारखे असल्याचे म्हटले जाते. मात्र, सरकार रिक्षाचालकांकडे लक्ष देण्यास तयार नाही, असे बाबा आढाव म्हणाले.
सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष असल्याने आम्ही तिन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर आंदोलन करत आहोत. या सरकारने रिक्षाचालकांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आगामी काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही बाबा आढाव यांनी दिला.