पुणे - रिक्षात विसरलेले सोन्याचे दागिने प्रामाणिक रिक्षा चालकाने मूळ मालकाला परत केले आहेत. त्याच्या या कामगिरीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे. भरत जाधव, असे प्रामाणिक रिक्षा चालकाचे नाव आहे. तर मंगल ढेरे, असे दागिने परत केलेल्या मूळ मालकिणीचे नाव आहे.
कौतुकास्पद! प्रवाशाचे लाखोंचे दागिने रिक्षाचालक भरतने केले परत - nigadi
प्रवाशाकडून रिक्षात विसरलेले सोन्याचे दागिने प्रामाणिक रिक्षा चालकाने मूळ मालकाला परत केले आहेत. त्याच्या या कामगिरीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे. भरत जाधव, असे प्रामाणिक रिक्षा चालकाचे नाव आहे. तर मंगल ढेरे असे दागिने परत केलेल्या मूळ मालकिणीचे नाव आहे.
मंगल ढेरे या शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या दिराच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या होत्या. वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर त्या चिंचवड येथून रिक्षातून आकुर्डी रेल्वे स्थानकापर्यंत प्रवास केला. तेथून त्या रेल्वेने पुण्याला जाणार होत्या. आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ उतरल्यानंतर त्यांनी त्यांची साडेपाच तोळ्याचे सोन्याचे गंठण असलेली बॅग रिक्षातच विसरली. ही बाबा मंगल यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रिक्षाचा शोध घेतला. मात्र, रिक्षा निघून गेली होती. त्यानंतर त्यांनी लागलीच निगडी पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलीस तपास करू लागले.
दरम्यान, रिक्षा चालक नेहमीप्रमाणे प्रवासी वाहतूक करत होता. मंगल यांना सोडल्यानंतर त्यांनी अनेक प्रवाशांची वाहतूक करत रात्री घरी गेले. रात्रभर ती बॅग रिक्षाच्या मागील बाजूसच होती. रिक्षाचालक भरत हे सकाळी उठल्यानंतर परिवारासह दगडूशेठ गणपतीचे दर्शन घ्यायला गेले. दर्शन झाल्यानंतर त्यांच्या मुलाच्या नजरेस ती बॅग पडली. त्याने लागलीच ही बाब भरत यांच्या लक्षात आणून दिली. भरत यांनी बॅगची तपासणी केली असता त्यात सोन्याचे दागिने दिसले. त्यानंतर त्यांनी चिंचवड पोलीस ठाणे गाठत याची माहिती पोलिसांना दिली. याच बॅगचा शोध निगडी पोलीस घेत असल्याचे चिंचवड पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी निगडी पोलिसांच्या मदतीने मंगल यांच्याशी संपर्क करून चिंचवड पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्यानंतर प्रामाणिक भरत जाधव यांच्यासमक्ष सोन्याचे दागिने असलेली बॅग मंगल ढेरे यांना परत दिली. रिक्षाचालकाच्या या प्रामाणिकपणाचे कौतूक करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे यांनी पुष्पगुच्छ देऊन भरत जाधव यांचा सन्मान करण्यात आला. मंगल ढेरे यांनीही रिक्षाचालकाचे आभार मानले.