पुणे:एका राजकीय नेत्याची कॉल रेकॉर्डिंग पहिली तर त्याने पुण्यात दंगली घडवा, असे सांगितले होते. असे काही राजकीय पक्ष आहेत की, ज्यांचे नाव घेत नाही. हे पक्ष चांगले काम करून सत्तेत येऊ शकत नाही किंवा या भावनेतून ते कामही करत नाही, असे यावेळी मंत्री मुनगंटीवार म्हणाले. पुण्यात आज बालगंधर्व रंगमंदिर येथे भाजप कार्यसमितीची बैठक पार पडली. यामध्ये ते बोलत होते.
धूप प्रथेवर काय म्हणाले मुनगंटीवार?नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात जी घटना घडली आहे तिथे अनेक वर्षांपासून धूप दाखवण्याची परंपरा असल्याचे सांगितले जात आहे. यावर मुनगंटीवार यांना विचारले असता ते म्हणाले की, याची पूर्ण चौकशी केल्यानंतरच निष्कर्षापर्यंत पोहचले पाहिजे. या अगोदर किती वर्षांपूर्वी धूप दाखवली गेली. ही परंपरा 500 वर्षांपूर्वीची आहे की, आता 5 ते 6 वर्षांपूर्वी सुरू झालेली आहे, हे पाहावे लागणार आहे आणि जर कोणी 2 ते 3 वर्षांपूर्वी ही परंपरा सुरू केली असेल तर हे खूप धक्कादायक आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.
संजय राऊतांवर काय म्हणाले मुनगंटीवार?शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावर टीका केली आहे. यावर मुनगंटीवार म्हणाले की, कोण संजय राऊत? हे अजितदादांना देखील माहीत नाही, असे अख्खा महाराष्ट्र विचारणार आहे. जे. पी. नड्डा कुठे आणि राऊत कुठे? त्यांनी फक्त आमच्या नितेश राणे यांच्या प्रश्नाला उत्तरे द्यावीत. या दोघांची आम्ही जोडी केली असल्याचे यावेळी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.