पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी रात्री उशिरा १२ जणांच्या टोळीने पूर्ववैमनस्यातून एका तरूणावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. तसेच 7 वाहनांची तोडफोडही करण्यात आली आहे. याबाबत राजकुमार आरसन पिल्ले (वय - 25) याने फिर्याद दिली असताना सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात फिर्यादीसह चार जण जखमी झाले आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये तरुणावर कोयत्याने वार; ७ वाहनांची केली तोडफोड याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट - ४ ने आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये काही अल्पवयीनांचा समावेश आहे. जखमींमध्ये फिर्यादी राजकुमार, संतोष सिद्धेश्वर चौधरी, चेतन गणेश जवरे, अजय भरत कांबळे यांचा समावेश आहे.
आरोपींनी तोडफोड केलेले वाहन. पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे निलख परिसरात फिर्यादी राजकुमार हा त्याच्या मित्रांसह खंडोबा माळ मंदिर येथील परिसरातून घरी जात होते. तेव्हा अचानक १२ जणांच्या टोळीने तलवारी आणि कोयत्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. राजकुमार याच्या डोक्यात आणि पायावर वार करण्यात आले. सोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली.
दरम्यान, मारहाण केल्यानंतर दहशत निर्मान करण्याचे हेतूने सार्वजनिक रस्त्यावरील ७ चारचाकी वाहनांची तलवारी आणि कोयत्याने तोडफोडही या टोळीने केली. चेतन अहिरे आणि समीर शेख (रा. कस्तुरबा गांधी झोपडपट्टी, औंध) अशी आरोपींची नावे आहेत. यांच्यासह इतर १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.