पुणे -पबजी गेम खेळण्यासाठी मोबाईल दिला नाही म्हणून मित्रावर कोयत्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला. यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला. सुनील सुरेश माने (वय १९) असे या तरुणाचे नाव आहे. सध्या त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुण्यात पबजीसाठी मित्रच बनला वैरी, मोबाईल दिला नाही म्हणून मित्रावर केला कोयत्याने वार - pubg game news in hadapsar
पुण्यातील हडपसर येथे पबजी गेम खेळण्यासाठी मोबाईल दिला नाही म्हणून मित्रानेच मित्रावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे.
हेमंतसिंग राजपूत (वय २४) यांनी याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक केली. सनी लोंढे (वय १८) आणि करण वानखेडे (वय २२) यांच्यासह आणखी दोघांना यात समावेश आहे. या हल्ल्यात सुनील गंभीर जखमी झाला आहे.
सुनील आणि आरोपी एकमेकांचे मित्र आहेत. ११ ऑगस्टला आरोपी सनीने सुनील याला पबजी खेळण्यासाठी मोबाईल मागितला होता. मात्र, सुनीलने मोबाईल देण्यास नकार दिला. या कारणावरुन त्यांच्यात बाचाबाचीही झाली. दरम्यान, १८ ऑगस्टला तक्रारदार हेमंतसिंग राजपूत याला घरी सोडण्यासाठी सुनील आला. यावेळी त्याला सोडून घरी जात असताना सनीने त्याच्या ३ मित्राच्या मदतीने सुनीलला रस्त्यात अडवून त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. यामध्ये त्याच्या उजव्या हातावर आणि मानेवर जखम झाली आणि तो गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करुन ४ आरोपींना अटक केली.