पुणे- गाडीत पेट्रोल भरण्यासाठी तुम्हाला पेट्रोलपंपावर जावे लागते. तेथे गेल्यानंतर पेट्रोल भरणारा कर्मचारी असेल तर ठिक अन्यथा कर्मचारी येईपर्यंत वाट पहाणे क्रमप्राप्त. पण या सर्वांवरही आता पुण्यातील एका पेट्रोलपंप मालकाने उपाय काढला आहे. या पेट्रोलपंपावर तुम्ही गेलात तर तुम्ही तुमच्या हाताने पेट्रोल भरू शकता. मागील दोन दिवसांपासून हा आत्मनिर्भर पेट्रोलपंप सुरू झाला आहे. पुण्यातील आरटीओ चौकात हा पेट्रोलपंप असून, दोन दिवसात अनेक पुणेकरांनी या आत्मनिर्भर पेट्रोलपंपावर जाऊन स्वतः पेट्रोल भरले आहे.
आता पेट्रोलपंपावर भरा स्वत:च पेट्रोल.. पुणेकरांसाठी 'आत्मनिर्भर पेट्रोलपंप' सुरू
पेट्रोलपंपावर गेल्यानंतर सर्वप्रथम ग्राहकाला सॅनिटायझर दिले जाते. त्यानंतर तेथील कर्मचारी संबंधित ग्राहकाला पेट्रोल कसे भरायचे याविषयी सूचना देतात. त्यानंतर पुढची संपूर्ण प्रक्रिया ग्राहकालाच करावी लागते. अशाप्रकारचा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग आहे.
पुणेकरांसाठी 'आत्मनिर्भर पेट्रोलपंप' सुरू
पेट्रोलपंपावर कर्मचारी पेट्रोल भरताना घोळ करतात, अशा अनेक पुणेकरांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे ग्राहकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी आम्ही हा प्रयोग केला आहे. आमच्या येथे येणाऱ्या ग्राहकाच्या मनात विश्वास निर्माण झाला पाहिजे ही यामागची भावना आहे. दोन दिवसांपासून आम्ही हा प्रयोग सुरू केला असून लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे, आत्मनिर्भर पेट्रोलपंपाचे मालक गिरीश मानकर यांनी सांगितले.