पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील एटीएम फोडणाऱ्या गुन्हेगारांना गुन्हे शाखा युनिट 1 च्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण 7 लाख 49 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यात 1 लाख 40 हजार रुपये रोख रकमेचा समावेश आहे. अजयसिंग अर्जुनसिंग दुधानी (20) आणि शेऱ्या उर्फ श्रीकांत विनोद धोत्रे (23ः) यांसह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपींला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 जूनला मध्यरात्री अज्ञात 5 जणांच्या टोळक्याने निगडी परिसरातील एटीएम मोटारीच्या साहाय्याने दोर बांधून फोडले होते. त्यातील साडेपाच लाख रुपये रक्कम काढून घेत हे एटीएम मुळा-मुठा नदीपात्रात फेकून दिले आणि आरोपींनी पोबारा केला. गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या फुटेजच्या आधारे आरोपींना पकडले.