बारामती -शरद पवार नैसर्गिक आपत्तीच्या संकटाचा सामना करण्याचा चांगला अनुभव आहे. किल्लारीला झालेल्या भूकंपाचे संकट त्यांनी चांगल्या प्रकारे हाताळले होते. या भूकंपात सर्वच हवालदिल झाले असताना त्यांनी रात्रंदिवस राबून पुन्हा तेथील लोकांना उभे केले होते. त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाच त्यांनी शरद पवारांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख केले. अशी आठवण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत सांगितली. बारामती येथील रुई ग्रामीण रुग्णालय परिसरात उभारण्यात आलेल्या 'प्री फॅब्रिकेटेड' हॉस्पिटलचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. यावेळी ते बोलत होते.
'वैद्यकीय व्यवसाय हा पैसे कमविण्याचा मार्ग नाही' -
वैद्यकीय व्यवसाय करताना सामाजिक भान ठेवले पाहिजे. वैद्यकीय व्यवसाय हा पैसे कमविण्याचा मार्ग नसून, रुग्ण व मानवसेवेचा वसा आहे. या व्यवसायाशी लोकांचे जीवन मरण अवलंबून आहे. हा व्यवसाय करताना सामाजिक जाणीव व संवेदनशीलता ढळू देऊ नका, असे आवाहन अजित पवार यांनी केले.