पुणे -पुणे येथील बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अभ्यास करत नसल्याच्या कारणावरून पित्याने सात वर्षाच्या मुलीला बेदम मारहाण केली. ताडीवाला रस्ता परिसरात मंगळवारी रात्री ही घटना घडली. शेजारी राहणाऱ्या तरुणाने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत संबधित पित्याला अटक केली आहे. नागेश महादेव जाधव (वय 36) असे अटक केलेल्या पित्याचे नाव आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेजाऱ्याने मुलीला वाचवले
आरोपी नागेश जाधव हा ताडीवाला रस्ता परिसरात पत्नी आणि सात वर्षाच्या मुलीसह राहतो. मोलमजुरी करून नागेश कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो. दरम्यान मंगळवारी रात्रीच्या सुमारास त्याने अभ्यास का करत नाहीस, असे म्हणत सात वर्षाच्या मुलीला मारहाण केली. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजारी राहणारे काही नागरिक नागेशच्या घरी आले. त्यावेळी नागेश हा आपल्या सात वर्षाच्या मुलीला लाटण्याने आणि पोळपाटाने मारहाण करत असल्याचे दिसून आले.