बारामतीत ‘एक गाव, एक दिवस’ या उपक्रमाचे कौतुक..
विजेच्या समस्यांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी बारामती महावितरण विभागाकडून ‘एक गाव, एक दिवस’ हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. या माध्यमातून विजेसंबंधीच्या समस्या तात्काळ मार्गी लागत असल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
बारामती - विजेच्या समस्यांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी बारामती महावितरण विभागाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या संकल्पनेतून ‘एक गाव, एक दिवस’ हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाद्वारे विजेसंबंधीच्या समस्या तात्काळ मार्गी लागत असल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
महावितरणच्या बारामती विभागांतर्गत येणाऱ्या सोमेश्वर उपविभागातील कुरणेवाडी, वाघळवाडी, निंबुत, चोपडज, आंबी बुद्रुक, नारोळी या सहा गावात महावितरणने शुक्रवारी दिवसभर ‘एक गाव, एक दिवस’ हा उपक्रम राबवून विजेच्या समस्यांवर प्रभावी काम केले असून, याबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला ‘एक गाव, एक दिवस’ या उपक्रमाची अंमलबजावणी आता राज्यभरात सुरू आहे. अत्यंत नियोजनबद्ध असा हा उपक्रम असून, एकाच दिवशी त्या गावातील समस्यांवर काम केले जाते. सोमेश्वर उपविभागात शुक्रवारी (दि. 20) रोजी मुख्य अभियंता पावडे, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील, कार्यकारी अभियंता गणेश लटपटे यांच्या उपस्थितीत वरील सहा गावांमधील विजेसंबंधीच्या समस्या निकाली काढण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला.
यांनी घेतला उपक्रमात सहभाग -
कंत्राटदारांचे 88 व महावितरणच्या 72 अशा 160 कर्मचाऱ्यांनी या उपक्रमांत प्रत्यक्ष सहभाग घेतला. या सोबतच सोमेश्वरचे उपविभागीय अभियंता सचिन म्हेत्रे व त्यांच्या शाखा अभियंत्यांनीही मोलाची कामगिरी केली.
असा आहे उपक्रम -
या उपक्रमांतर्गत सैल तारांना ताण देणे, तारांना लागणाऱ्या फांद्या तोडणे, रोहित्रांची व पेट्यांची दुरुस्ती करणे, फ्यूज बदलणे, केबल बदलणे, कट पॉईंटच्या जंपिंग करणे, झुकलेले खांब सरळ करणे, आवश्यक ठिकाणी स्पेसर्स व ताण बसविणे तसेच नवीन कनेक्शनसह विजेच्या वैयक्तिक तक्रारी दूर करणे अशा बहुतांश समस्यावर काम करण्यात येते.