सोलापूर- महापालिकेच्या अर्थसंकल्पाची फक्त चर्चा केली जात आहे. मात्र त्याला अंतिम स्वरूप येत नसल्याने काँग्रेस आणि बसपच्या नगरसेवकांनी सत्ताधारी भाजप विरोधात आंदोलन केले. त्यानंतर परस्परांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केले जात आहेत.
मनपा सभागृहातील गदारोळानंतर सत्ताधारी-विरोधकांचे परस्परांवर आरोप-प्रत्यारोप - काँग्रेस
अर्थसंकल्पावरुन महापालिकेतील राजकारण चांगलेच तापले आहे. आता विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.
बसप नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी थेट पालिकेच्या प्रवेशद्वारात गाढवं आणली. तर काँग्रेसच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी चक्क पालिकेच्या सभागृहालाच कुलूप लावले. अर्थसंकल्पाची चर्चा न करता महापौरांनी दुखवटा प्रस्ताव मांडून सभा तहकुबीची घोषणा केली. त्यामुळे संतप्त नगरसेवकांनी हे आंदोलन केले. त्यावर नगरसेविका श्रीदेवी फुलारे आणि आनंद चंदनशिवे यांनी केवळ सभागृहाचा नव्हे, तर शहराचा अवमान केला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष शिवसेनेने केली. अर्थसंकल्प हा जनताभिमुख असावा, यासाठी सत्ताधारी आणि विरोधी शिवसेना यांच्या मागणीप्रमाणे आणखी काही काळ वेळ दिला आहे, असा खुलासा महापौरांच्या वतीने करण्यात आला.
काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक यु. एन. बेरिया यांनी सत्ताधारी आणि विरोधकांत समन्वय नसल्याचे स्पष्ट केले. शहराचा विकास खुंटल्याचा दावाही त्यांनी केला. त्यामुळे खरे कोण अन् खोटे कोण हे कळायला मार्ग नाही. पण सोलापूरचा विकास मात्र खुंटला हे नक्की.