पिंपरी-चिंचवड (पुणे) - जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाविरोधात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील 4 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे सदस्य सचिव माने यांच्याकडे पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे ग्रामीण व छावणी हद्दीतील कोरोना तपासणी करणाऱ्या शासकीय तसेच खासगी मान्यताप्राप्त प्रयोगशाला व इतर बाबींवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
प्रयोगशाळांमध्ये कोरोना (कोविड-19) चाचणी संख्या वाढविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे, तसेच या लॅबमध्ये पूर्ण क्षमतेने तपासण्या होतात किंवा नाही याची तपासणी करणे. कोरोना टेस्टचा निर्णय कळण्यासाठी लागणारा कालावधी कमीत कमी करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याची जबाबदारी सुद्धा माने यांच्याकडे देण्यात आली आहे.