पुणे - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor bhagat singh koshyari) यांच्या हस्ते आज पुण्यातील विधान भवन येथे ध्वजारोहण पार पडले. यानंतर राज्यपाल उपस्थित अधिकारी आणि नेत्यांना भेटण्यासाठी गेले. यावेळी काँग्रेसचे नेते शरद रणपिसे (Congress Leader Sharad Ranpise) यांनी 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न विचारला. तेव्हा राज्यपालांनी काँग्रेस नेत्यांना सुनावले.
झेंडावंदन पार पडल्यानंतर राज्यपाल उपस्थित नागरिकांना भेटण्यासाठी गेले. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) देखील होते. दरम्यान राज्यपाल खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) आणि काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्याजवळ पोहोचल्यानंतर 12 सदस्यांची नियुक्ती करा असे विचारत या सदस्यांना विधान परिषदेत येण्याचा मार्ग मोकळा करावा अशी विनंती रणपिसे यांनी केली. त्यावर राज्यपालांनी आपल्या खास शैलीत रणपिसे यांना उत्तर दिले.
राज्यपालांनी रणपिसेंना सुनावले
'अजित पवार माझ्याबरोबर आहेत. ते माझे चांगले मित्र आहेत. याबाबत राज्य सरकार आग्रह धरत नाही, मग तुम्ही का धरता? याबाबतीत राज्य सरकारने पाठपुरावा केला पाहिजे', अशा शब्दात राज्यपालांनी रणपिसे यांना सुनावले.
कोर्टानंतर आपण बोलण्याची गरज नाही- अजित पवार
याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा केली. ते म्हणाले, की '12 सदस्यांच्या नियुक्तीचा विषय कोर्टात गेला आहे. तसेच यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि मी पंतप्रधान नरेंद्र मोदीला (PM Narendra Modi) देखील भेटलो होतो. आता तर कोर्टानेही यावर सूचक विधान केले आहे. त्यामुळे यावर अधिक काही बोलण्याची गरज नाही'.
काँग्रेस पक्षात आपापसात समन्वय नाही - गिरीश बापट
हा प्रकार घडला त्यावेळी पुण्याचे खासदार गिरीश बापट येथे उपस्थित होते. याविषयी माहिती देताना ते म्हणाले, की 'शरद रणपिसे यांनी 12 आमदार नियुक्तीचा विषय काढल्यानंतर राज्यपाल म्हणाले की काँग्रेसचे नेते म्हणून तुम्ही माझ्याकडे मागणी करत आहात. परंतु तुमचे नेते त्या बाबतीत काहीही बोलत नाहीत. त्यामुळे यातूनच काय ते समजून घ्यावे. या प्रकारातून काँग्रेस पक्ष आणि त्यांचे नेते यांच्यामध्ये समन्वय नसल्याचे दिसून येते. नेतेच बोलत नसतील तर इतरांनी बोलून उपयोग नाही. राज्यपाल हे घटनेप्रमाणे चालणारे केंद्र सरकारचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे योग्यवेळी योग्य व्यक्तींशी चर्चा करून ते योग्य निर्णय घेतील'.
काय आहे 12 आमदारांच्या नियुक्तीचा विषय?
महाविकास आघाडी सरकारच्या वतीने राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नावांची यादी ६ नोव्हेंबर २०२० रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सादर केली. यादी सादर करुन 8 महिने उलटले तरीही राज्यपालांनी 12 आमदारांच्या नियुक्तीवर मौन सोडले नाही. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष निर्माण झाला आहे.