पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या टाळेबंदीदरम्यान बंद असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार आजपासून सुरू झाले आहेत. शनिवारी (दि.30 मे) रात्रीपासून भाजीपाला, फळांच्या गाड्या येण्यास सुरुवात झाली असून आज (दि. 31 मे) पहाटेपासून या बाजाराला सुरुवात झाली. असून सुमारे 200 वाहनांमधून 11 हजार क्विंटल शेतमालाची आवक झाली आहे.
पुणे बाजार समिती पुन्हा एकदा गजबजली, शेतमालाची २०० वाहने दाखल
शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि ग्राहकांना वाजवी दरात भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी आडते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासन यांच्यात झालेल्या बैठक झाली. त्यानंतर बाजार समितीने मार्केटयार्डमधील व्यवहार परत सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार काही अटींसह बाजार समिती सुरु झाली आहे.
खरेदी-विक्री दरम्यान येथे होणारी गर्दी टाळण्यासाठी विविध नियम व अटी घालून देण्यात आले आहेत. प्रवेशद्वारावर येणाऱ्या प्रत्येकाचे तापमान थर्मलगनद्वारे नोंदवले जात आहे. सामाजिक अंतराचे नियम पाळण्यासाठी 50 टक्के आडते एका दिवशी तर 50 टक्के आडते दुसऱ्या दिवशी याप्रमाणे काम करतील. त्यानुसार आज सकाळपासून हा बाजार गजबजलेला पाहण्यास मिळाला. या बाजारात सकाळपासून 200 गाड्यांमधून 11 हजार क्विंटल इतक्या शेतमालाची आवक झाली आहे.
हेही वाचा -अखेर पुणे विभागातून 2 लाख 4 हजार परप्रांतीय रेल्वेने रवाना