पुणे - कोरोना रुग्णसंख्या पाहता ससून रुग्णालयामध्ये अजून 400 खाटा वाढवणार आहोत. आधी 450 खाटा होत्या आता नव्याने 400 खाटा वाढवून एकूण संख्या 850 करणार आहोत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच ससून रुग्णालयातील कोरोना रुग्णांवर उपचार होण्याच्या दृष्टीने रुग्णालय प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करावे, असे सांगून कोविड रुग्णांच्या उपचारासाठी डॉक्टरांची कमतरता भासू नये, यासाठी येथील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी दिले.
माहिती देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयाला आज आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भेट देऊन कोरोनाच्या रुग्णांना देण्यात येत असलेल्या सोयी-सुविधांची माहिती घेतली. यावेळी आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ.सुभाष साळुंखे, विभागीय आयुक्त सौरभ राव, ससूनचे विशेष कार्य अधिकारी एस.चोक्कलिंगम, उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ बुटाला, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
हेही वाचा -राज्यात कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढला : आज २० हजार ५९८ नव्या रुग्णांची नोंद
ससूनच्या कोविड रुग्णालयासंदर्भात बोलताना आरोग्य मंत्री टोपे म्हणाले, जिल्ह्यात कोविड-19 बाधितांना तातडीने उपचार मिळण्यासाठी ससून बरोबरच सर्व खासगी रुग्णालयांनी ऑक्सिजन व व्हेंटिलेटरयुक्त बेडची संख्या वाढवावी. तसेच खासगी रुग्णालयांनी 80 टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ससून रुग्णालयाला ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी ऑक्सिजनची टाकी बसवावी. तसेच या अनुषंगाने सुरू असणारी कामे जलदगतीने पूर्ण करावीत. राज्यातील इतर जिल्ह्यांमधील तसेच पुण्यातील अन्य रुग्णालयातील रुग्णांना 'टेलिमेडिसीनव्दारे' उपचार करण्यासाठी ससूनच्या डॉक्टरांनी पुढाकार घ्यावा. कोविडच्या चाचण्या लवकरात लवकर होण्यासाठीचे किट माफक दरात पुरविण्यासाठी या कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या रुग्णांना आरोग्याच्या सेवा-सुविधा चांगल्या प्रकारे मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून ससून रुग्णालयाला आवश्यक औषधांचा साठा व साधन सामग्री उपलब्ध करून देण्यात येईल. कोरोनाचा वाढत जाणारा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनीही दक्षता घेणे आवश्यक असल्याचे सांगून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मास्क व सॅनिटायझरचा वापर तसेच सामाजिक अंतर राखावे, असे आवाहन आरोग्यमंत्री टोपे यांनी केले.
हेही वाचा -५३ कोटी जनावरांना मिळणार आधार कार्ड, सरकारने सांगितले कारण...