महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवातील कलाकारांच्या नावांची घोषणा - तुकाराम दैठणकर

Sawai Gandharva Bhimsen festival सवाई गंधर्व महोत्सवासंदर्भात आज महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या १३ ते १७ डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रीय मंडळ कीडासंकुल, मुकुंदनगर येथे महोत्सव होणार आहे. या महोत्सवात सहभागी होणाऱ्या गायक कलाकारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 22, 2023, 8:06 PM IST

सादरीकरण करणाऱ्या कलाकारांची घोषणा

पुणे Sawai Gandharva Bhimsen festival : येत्या १३ ते १७ डिसेंबर दरम्यान मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुल येथे ६९ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव होणार आहे. यात सहभागी होणाऱ्या कलाकारांची यादी आज आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी जाहीर केली आहे.

चालू वर्ष पं. कुमार गंधर्व, पं. राम मराठे आणि पं. सी. आर. व्यास यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. या तीनही दिग्गज कलाकारांना आदरांजली वाहण्याच्या उ‌द्देशाने त्यांच्या परंपरेतील कलाकार यावर्षी महोत्सवात आपली कला सादर करणार आहेत. महोत्सवाची वेळ पहिल्या दिवशी (१३ डिसेंबर) दुपारी तीन वाजता असणार आहे. यानंतर १४ व १५ डिसेंबर या दोनही दिवशी महोत्सव दुपारी ४ वाजता सुरू होणार आहे. तर १६ डिसेंबरला महोत्सव दुपारी ४ वाजता सुरू होईल आणि शेवटच्या दिवशी (१७ डिसेंबर) महोत्सवाची वेळ दुपारी १२ ते रात्री 12 अशी असणार आहे.




दिवस पहिला (१३ डिसेंबर, २०२३) -सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सुरुवात तुकाराम दैठणकर आणि सहकारी यांच्या सनईवादनाने होईल. यानंतर पं. श्रीकांत देशपांडे यांचे शिष्य तसंच किराणा घराण्याचे गायक संजय गरुड आपली गायनसेवा सादर करतील. पं. कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत त्यांच्या कन्या आणि शिष्या कलापिनी कोमकली यांचे गायन होईल. यानंतर सुप्रसिद्ध सरोदवादक तेजेंद्र नारायण मजुमदार यांचे सरोदवादन होईल. महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सांगता गायक पं. उल्हास कशाळकर यांच्या गायनाने होईल.

दिवस दुसरा (१४ डिसेंबर, २०२३) - संगीतमार्तंड पं. जसराज यांच्या शिष्या आणि मेवाती घराण्याच्या युवा गायिका अंकिता जोशी यांच्या गायनाने महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात होईल. यानंतर भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य व किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. उपेंद्र भट आपले गायन सादर करतील. सुप्रसि‌द्ध सतारवादक पं. निखील बॅनर्जी यांच्या परंपरेतील पार्या बोस यानंतर सतारवादन प्रस्तुत करतील. जयपूर-अत्रौली घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका विदुषी अश्विनी भिडे देशपांडे यांच्या गायनाने महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप होईल.

दिवस तिसरा (१५ डिसेंबर, २०२३) - किराणा घराण्याचे युवा कलाकार रजत कुलकर्णी यांच्या गायनाने महोत्सवाचा तिसरा दिवस सुरु होईल. यानंतर सवाई गंधर्व यांच्या नातसून श्रीमती पद्‌द्मा देशपांडे यांचे गायन होईल. सुप्रसिद्ध सतारवादक नीलादी कुमार यानंतर आपले सतारवादन प्रस्तुत करतील. किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं अजय पोहनकर यांचे गायन यानंतर होईल. यावेळी पं अजय पोहनकर यांचे पुत्र आणि शिष्य अभिजित पोहनकर यांचाही यावेळी सादरीकरणामध्ये सहभाग असेल.

दिवस चौथा (१६ डिसेंबर, २०२३) -पं. राम मराठे यांच्या नात असलेल्या गायिका प्राजक्ता मराठे यांच्या गायनाने महोत्सवाच्या चौथ्या दिवसाची सुरुवात होणार आहे. यानंतर गायन आणि सतार यांचा संगम उपस्थित रसिक प्रेक्षकांना अनुभविता येईल. याअंतर्गत विदुषी गिरीजा देवी यांच्या परंपरेतील देबप्रिय अधिकारी हे गायन तर समन्वय सरकार हे सतारवादन सादर करतील. यानंतर सुप्रसिद्ध नर्तिका, नृत्यदिग्दर्शिका असलेल्या श्रीमती यामिनी रेड्डी यांच्या कुचीपुडी नृत्याचे सादरीकरण होईल. सुप्रसिद्ध संतूरवादक अभय सोपोरी यांच्या संतूरवादनाचा आस्वाद यानंतर रसिकांना घेता येणार आहे. बेगम परवीन सुलताना यांच्या सुमधुर गायनाने महोत्सवाच्या चौथ्या दिवसाचा समारोप होईल.

दिवस पाचवा (१७ डिसेंबर, २०२३) -६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवसाची सुरुवात भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य आणि सुपुत्र श्रीनिवास जोशी यांच्या गायनाने होईल. यानंतर आग्रा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पं. बबनराव हळदणकर यांच्या शिष्य श्रीमती पौर्णिमा धुमाळे यांचे गायन होईल. पं. सी. आर. व्यास यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत त्यांचे सुपुत्र असलेले पं. सुहास व्यास हे यानंतर गायन सादर करतील. यानंतर ऐश्वर्या वेंकटरामन आणि सहकारी यांचा कर्नाटक शास्त्रीय संगीताचा अनुभव देणारा अनोखा कार्यक्रम संपन्न होईल. पतियाळा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पं. अजय चक्रबर्ती यांच्या शिष्या आणि सुप्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रबर्ती यांचे गायन यावेळी महोत्सवात रसिकांना अनुभविता येणार आहे. यानंतर संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध बासरीवादक रोणू मजुमदार यांचे बासरीवादन होईल. किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी प‌द्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने ६९ व्या सवाई गंधर्व महोत्सवाची सांगता होईल.

पहिल्यांदाच कला सादर करणारे कलाकार -यंदाच्या वर्षी सवाई गंधर्व महोत्सवात अंकिता जोशी, पार्था बोस, रजत कुलकर्णी, प्राजक्ता मराठे, ऐश्वर्या वेंकटरामन आणि सहकारी, पौर्णिमा धुमाळे आणि यामिनी रेड्डी आदी कलाकार हे पहिल्यांदा आपली कला सादर करणार आहे. सवाई गंधर्व संगीत महोत्सवासाठी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास परवानगी मिळाली आहे. पुणे शहरात १३ ते १७ डिसेंबर या कालावधीत आयोजित ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासाठी १६ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार परवानगी देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यासाठी सवलतीचे १५ दिवस निश्चित करण्यात आले आहेत. त्यापैकी १४ दिवस सवलत देण्यात आली असून शिल्लक राहिलेला १ दिवस आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या विनंतीवरून १६ डिसेंबर रोजी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास परवानगी देण्यात येत आहे. ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करावा. ध्वनीचे शोषण करणारे विशिष्ट लाकडी सामुग्री आवश्यक त्या ठिकाणी लावावी. क्षेत्राप्रमाणे ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज ठेऊ नये तसेच शांतता क्षेत्रात ही सूट लागू नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details