पुणे - देशात नवरात्रोत्सव सुरू असून सध्या जिल्ह्यातील मावळ परिसरात शेतात राबणारी एक वनदुर्गा चर्चेत आहे. दुचाकी, ट्रॅक्टर, पॉवर ट्रेलर, चारचाकी चालवणारी ही वनदुर्गा सेंद्रिय शेती करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत आहे. आठ वर्षांपूर्वी दुचाकीच्या अपघातात पतीचा मणक्याला जबर मार लागल्याने शेती कशी करायची, असा यक्ष प्रश्न त्यांच्यापुढे होता. परंतु, त्याची पत्नी म्हणजे 'वनदुर्गा' रुपाली नितीन गायकवाड यांनी सर्व जबाबदारी खांद्यावर घेत पती नितीन यांच्या खांद्याला खांदा लावून शेती करत आहेत. गेल्या सोळा वर्षांपासून त्या शेतात राबत असून वर्षाकाठी त्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. 2017-18 साली राज्याच्या शेतीनिष्ठ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. तर, पीक स्पर्धेत त्यांनी जिल्ह्यातून अव्वल नंबर देखील पटकावला होता. त्यामुळे या वनदुर्गाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
रुपाली नितीन गायकवाड या मावळमधील चांदखेड येथे राहतात. त्यांना शेतीची लहानपणापासूनच आवड होती. वडील नसल्याने त्यांची आई शेतात एकटीच राबायची. त्या नेहमी शेतातून चांगलं उत्पन्न घेत असत. तेव्हापासून रुपाली यांनाही शेतीविषयीचे आकर्षण आणि आवड निर्माण झाली. कालांतराने रुपालीचा विवाह झाला. नितीन यांना देखील शेतीची आवड असल्याने दोघांची जोडी चांगली जमली. शेतात राबायची आवड असल्याने सासरची पडीक जमीन रुपाली आणि त्यांच्या पतीने मेहनत करून कसदार बनवली. त्यात वेगवेगळे प्रयोग केले, आणि त्यात रुपाली यांना यश आले. पुन्हा, सेंद्रिय शेती करत फळबाग, वेगवेगळ्या भाज्या, भाताची लागवड केली असे रुपाली सांगतात.