पुणे - देशाचे संरक्षण मंत्री शुक्रवारी (दि. 27 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते पुण्यातील सैन्य दलाच्या एका मैदानाला स्वर्ण पदक विजेता नीरज चोप्राचे नाव देण्यात आले. त्यानंतर केलेल्या भाषणात राजनाथ सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना खेळाचे शिक्षण समर्थ रामदास आणि दादोजी कोंडदेव यांनी दिले, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून महाराष्ट्रात निषेध करण्यात येत आहे. खासदार अमोल कोल्हे यांनीही सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून त्याबद्दल आपली नाराजी व्यक्त केली. खरा आणि तर्कसंगत इतिहास लिहिण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
राजनाथ सिंह यांच्या विधानाचा निषेध
राजनाथ सिंह यांच्या विधानाचा मी निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राज्य ठरले ते त्यांनी निर्माण केलेल्या रयतेच्या कल्याणकारी राज्यामुळे आणि त्या स्वराज्याला असणाऱ्या नैतिक अधिष्ठानामुळे. जर आपण ऐतिहासिक कागदपत्रांचा धांडोळा घेतला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या काळातील स्वराज्यस्थापनेच्या प्रयत्नाविषयी दादोजी कोंडदेव यांची नाराजी होती. आदिलशहाच्या दरबारात शहाजी महाराजांना त्रास तर होणार नाही ना ही स्वामीनिष्ठा त्या पाठीमागे होती हे सिद्ध होते, असे खासदार कोल्हे म्हणाले.