पुणे- गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेना का सोडली? या प्रश्नाची चर्चा शिरूर लोकसभा मतदार संघात सुरू आहे. मात्र, प्रचाराच्या सांगता सभेत आज स्वतः डॉ. कोल्हेनी गौप्यस्फोट केला. मी शिवसेनेत असताना मला सातारा लोकसभा मतदारसंघातून छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला जात होता. मात्र, छत्रपतींच्या गादीशी कधीच गद्दारी करणार नाही ही भावना मनात धरून बाहेर पडलो, असल्याचे ते म्हणाले.
शिरूर लोकसभा मतदारसंघावर गेल्या १५ वर्षांपासून शिवसेनेचे खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी जनमानसात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसने स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांना आढळरावांच्या विरोधात मैदानात उभे उतरवले आहे. शिरूर लोकसभेची लढाई सुरू झाली तेव्हापासून भाजप-सेना युतीकडून शिरूर लोकसभा मतदारसंघात १३ मंत्र्यांच्या सभा झाल्या. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्येक नेत्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. या प्रचार दौऱ्यामध्ये राष्ट्रवादीकडून विमानतळ, बैलगाडा शर्यत बंदी, पुणे-नाशिक महामार्गांवरील वाहतूक कोंडी या प्रमुख मुद्द्यांना लक्ष्य करण्यात आले.