प्रतिक्रिया देताना अमोल कोल्हे पिंपरी चिंचवड (पुणे)Amol Kolhe Reaction : अजित पवारांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली आहे. तसंच त्यांनी एक-दीड वर्षापूर्वी मला राजीनामा देणार असल्याचं सांगितलं होतं, असा गौप्यस्फोट देखील अजित पवार यांनी केलाय. यावर आता शिरूरचे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना त्यांच्या खास शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार फार मोठे नेते आहेत, त्यांच्यावर मी काय बोलणार? ते कायम मार्गदर्शक ठरलेत. मात्र पालकमंत्री असताना त्यांनी मतदारसंघात जास्तीचा निधी दिला असता तर विकास कामे जास्त झाली असती, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय.
अजित पवार नेमकं काय म्हणाले: राष्ट्रवादीच्या दोन खासदारांकडून शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. पुण्यात जाहीर सभा देखील होणार आहे. याबद्दल अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, चांगली गोष्ट आहे, पण त्यातल्या एका खासदाराने पाच वर्ष आपल्या मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं. त्यातला एक खासदार एक-दीड वर्षापूर्वी माझ्याकडे आला होता, मला राजीनामा द्यायचा म्हणून. त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे. त्या खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटील यांनी जीवाचं रान केलं आहे. त्यांना खासगीत समोरासमोर बोलावं. मी बोलणार नव्हतो पण यांना आता उत्साह आला आहे. कोणाला पदयात्रा सुचते, कोणाला संघर्ष यात्रा काढायची आहे, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला. संभाजी महाराज यांच्याबद्दल उत्तम भूमिका त्यांनी बजावली होती. पण शिरुरमध्ये आम्ही पर्याय देणार, तुम्ही काळजीच करू नका. तिथे असलेला उमेदवार निवडणून आणणारचं, असं थेट आव्हानही अजित पवार यांनी दिलं आहे.
अजित पवारांच्या वक्तव्यावर अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया : एकत्र पक्ष असताना सगळ्यांचं सहकार्य होतं. आता उगाच ताकाला जाऊन भांडं लपवण्यात अर्थ नाही, आता परिस्थिती बदलली म्हणून खोटं बोलणं, हे माझ्या तत्वात बसत नाही. ही वस्तुस्थिती आहे, या दोघांनीही त्यावेळी 100 टक्के प्रयत्न केले. मी हे नाकारण्याचं काहीच कारण नाही. दादा मोठे नेते, मी फार लहान कार्यकर्ता, त्यांच्याविषयी बोलणं उचित नाही असं म्हणत आवरतं घेतलं. चांगलं काम जेव्हा केलं तेव्हा अजितदादांनी शाबासकीची थाप दिली आहे. अनेकदा दादांनी कौतुक केलं आहे. मात्र आज त्यांनी विरोधात बोलल्यानंतर लगेच त्यावर प्रतिक्रिया देण्याइतपत मी मोठा नाही, असं अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलंय.
शिरूर उमेदवारीसाठी विलास लांडे इच्छुक: भोसरीचे आमदार विलास लांडे हे देखील शिरूर लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं म्हटलं जात आहे. अजीत पवारांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका केल्यानंतर आमदार विलास लांडे यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं विलास लांडे यांनी आपली प्रतिक्रिया देत भूमिका स्पष्ट केलीय. शिरूर मतदार संघासाठी विलास लांडे 2019 मध्ये इच्छुक होते. मागील वेळेस देखील आपली तयारी होती. मागच्या वेळी अमोल कोल्हे यांना शिरूरमधून संधी दिली गेली. मी अजित पवार यांचे नेतृत्व मान्य करुन थांबलो. परंतु आता आपली शंभर टक्के तयारी आहे, असं विलास लांडे यांनी म्हटलंय.
हेही वाचा :
- सरकारला फक्त 'मन की बात' करायची आहे, त्यांना 'जन की बात' ऐकायची नाही - डॉ. अमोल कोल्हे
- बारामतीच काय राज्यात शरद पवारांना पर्याय नाही; अजित पवारांच्या घोषणेवर शरद पवार गटाचा दावा
- ट्रिपल इंजिन.. ट्रिपल वसुली; खासदार अमोल कोल्हेंनी सांगितला सिग्नलवरील धक्कादायक अनुभव