पुणेAmbadas Danve on Nagpur Rain : पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळं नागपूर शहरात अनेक भागात गुडघाभर पाणी साचलं होतं. पावसामुळं नागपूरमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. नागपूर येथे झालेल्या मुसळधार पावसावर विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले की, पावसाळ्यात मुंबई नेहमी तुंबते. स्थलांतरित करावं लागतं, असे नेहमी मुंबई शहराबद्दल आरोप होतात. पण आता नागपूरची अवस्था बघितली, तर ग्रामीण भागातील 'मोठ्या घरचा पोकळ वासा' या म्हणीसारखी दिसतेय. हा पोकळपणा नागपूरच्या नेतृत्वात दिसतोय. नागपूरमधील जनता एका मोठ्या पावसानं अस्वस्थ झालीय. अजून तर खूप पाऊस व्हायचा आहे. दुसऱ्यावर आरोप करताना स्वत:च्या खाली काय जळतंय, ते पाहिलं पाहिजे, असं म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावलाय. नागपूरच्या जनतेला लवकरात लवकर मदत मिळाली पाहिजे, असं देखील यावेळी दानवे म्हणाले.
सरकारचं लक्ष नाही :विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विविध गणेश मंडळांना भेट दिलीय. तसंच शिवसेना शहराध्यक्ष संजय मोरे यांच्या घरी देखील भेट देत बाप्पाची आरती केलीय. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय. राज्यातील दुष्काळाबाबत ते म्हणाले की, दुष्काळ पडत असताना अवेळी पाऊस पडणं हा देखील दुष्काळ आहे. सरकार कुठेही लक्ष देत नाहीय. विमा कंपनी काही करत नाही. दुर्देवानं टँकरनं पाणी द्यावं लागतंय. सरकार 'शासन आपल्या दारी'ची घोषणा करतंय. आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांची यादी समोर आलीय. हे सरकार आल्यापासून आत्महत्या वाढल्या आहेत. सरकारला जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे, अशी टिका यावेळी अंबादास दानवे यांनी केलीय.
सरकार संवेदनाहीन :यावेळी विरोधी पक्ष कुठेतरी कमी दिसत आहे का, असं यावेळी दानवे यांना विचारलं असता ते म्हणाले की, विरोधीपक्ष सगळीकडे जात आहे. हे सरकार गेंड्याच्या कातडीचे झालं आहे. हे सरकार संवेदनाहीन झालंय. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काहीही देणंघेणं नाही. दिल्लीत नुसते मुजरे करणे, तळवे चाटणे आणि हुजरेगिरी करणे, एवढंच ते करत आहे, असा टोलाही दानवेंनी लगावलाय