पुणे -भारताच्या 74व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय भाषांतील पंधरा लिपी एकत्र करून राष्ट्रगीत साकारण्यात आले आहे. भारतातील 15 सुलेखनकार आणि एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातील संगीत कला अकादमीच्या 15 विद्यार्थ्यांद्वारे 'अक्षरभारत' संकल्पनेअंतर्गत हे गीत तयार करण्यात आले आहे.
भारतीय लिपींद्वारे राष्ट्रगीताला अनोखी मानवंदना - tribute to national anthem by scripts
भारत हा शेतीप्रधान देश जसा आहे तसाच तो लिपीप्रधानसुद्धा आहे. या संकल्पनेतून भारतातील १५ लिपी आणि १५ सुलेखनकार यांना सोबत घेऊन राष्ट्रगीतातील प्रत्येक ओळ प्रत्येक लिपीत मांडली आहे.
एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ आणि सुलेखनकार अच्युत पालव यांनी 'अक्षरभारत' संकल्पनेअंतर्गत भारताचे राष्ट्रगीत विविध लिपींमध्ये साकारले आहे. यामध्ये देवनागरी, ओडिशा, तेलुगु, कन्नडा, मल्याळम, गुजराथी, उर्दु, तमिळ, गुरूमुखी, मोडी, काश्मिरी, बंगाली, असामी, मैथिली, सिद्धम अशा पंधरा लिपींचा समावेश आहे. त्यात अच्युत पालव, एस. के. मोहंती, नवाकांथ करीडे, जी. व्ही. स्त्रीकुमार, नारायण भट्टथीरी, गोपाल पटेल, महमूज अहमद शेख, मनोज गोपीनाथ, प्रभसिमर कौर, केतकी गायधनी, अन्वर लोलाबी, हिरेन मित्रा, मनीषा नायक, रुपाली ठोंबरे आणि अवधूत विधाते यांचा समावेश आहे. तसेच एमआयटी संगीत कला अकादमीचे सचिव अदिनाथ मंगेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत कला अकादमीच्या 15 विद्यार्थ्यांनी हे राष्ट्रगीत स्वरबद्ध केले आहे. एमआयटी स्कूल ऑफ फाईन आर्टस् चे प्रा. तुषार पनके यांनी संकलन तर कुणाल कुलकर्णी यांनी ध्वनीसंकलन केले आहे.
भारत हा शेतीप्रधान देश जसा आहे तसाच तो लिपीप्रधानसुद्धा आहे. या संकल्पनेतून भारतातील १५ लिपी आणि १५ सुलेखनकार यांना सोबत घेऊन राष्ट्रगीतातील प्रत्येक ओळ प्रत्येक लिपीत मांडली आहे. यामुळे प्रत्येक भारतीयाला आपली लिपी राष्ट्रगीतात पाहता येणार आहे. भारतीय लिपींची सुंदरता राष्ट्रगीताद्वारे सर्व जगासमोर यावी, असे पालव यांची इच्छा होती. लॉकडाउनच्या काळात प्रत्येक सुलेखनकाराने आपले कौशल्य पणाला लावून काम केले आहे. बऱ्याच ठिकाणी शाई, कागदाची टंचाई भासली. दुकाने उघडी नसल्याने अडथळे आले, परंतु राष्ट्रगीताचा आदर आणि लिपीचा अभिमान मनामनात असल्याने हा संकल्प पूर्णत्वास नेता आला, अशी माहिती अच्युत पालव यांनी यावेळी दिली.