पुणे -कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे प्रशासनावरील ताणही वाढत आहे. कामाचा व्याप वाढल्यामुळे प्रशासकीय कर्मचारी अपुरे पडत आहे. ही बाब लक्षात घेऊन 'अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघा'च्या गिर्यारोहकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. पहिल्या टप्प्यात ७० गिर्यारोहक पुणे महानगरपालिकेसाठी 'कोविड सेवक' म्हणून विना मोबदला काम करत आहेत.
मध्यवर्ती पुणे शहरासोबतच उपनगर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतला आहे. त्यामुळे महानगरपालिकेने अनेक ठिकाणी कोविड सेंटर आणि स्वॅब सेंटर वाढवली आहेत. या ठिकाणी दररोज शेकडो नागरिक फोन करतात. त्याच बरोबर कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या लोकांची माहिती घेणे, त्यांना उपचारासाठी उपलब्ध ठिकाणे आणि सेंटरची माहिती देणे, त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती विचारणे, अशी अनेक कामे महानगरपालिकेचे कर्मचारी करत आहेत. मात्र, सेंटरची संख्या वाढल्यामुळे या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडू लागली आहे. मनुष्यबळाची गरज लक्षात घेता अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी गिर्यारोहक 'कोविड सेवक' म्हणून काम करतील, असा निर्णय घेतला. त्यांनी गिर्यारोहकांना 'कोविड सेवक' म्हणून सेवा देण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनला प्रतिसाद देऊन अनेक गिर्यारोहक मदतीसाठी पुढे आले. सध्या 70 गिर्यारोहक 'कोविड सेवक' म्हणून काम करत आहेत.