पुणे: राज्यातून वेदांत फॉक्सकॉन (vedanta foxconn project) पाठोपाठ आता एअरबस प्रकल्प (airbus project) देखील गुजरातला गेला आहे. याबाबत आता विरोधक आक्रमक झाले असून ते शिंदे सरकारवर टीका करत आहेत. यावर आता विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपलं मत मांडलं आहे.
अजित पवार प्रेस कॉन्फरन्स काय म्हणाले अजित पवार? : पुण्यात राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, मागच्या वेळेस वेदांत प्रकल्प गेला तेव्हा सत्ताधारी पक्ष म्हणाले होते की यापेक्षा मोठा प्रकल्प राज्यात आणू. पण त्याचे पुढे काय झाले काही ठाऊक नाही. मोठा तर सोडा पण आलेला एअरबस प्रकल्प देखील आता गेला आहे. माझं स्पष्ट म्हणणे आहे की आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा राज्यासाठी हे प्रकल्प महत्त्वाचे आहेत. असेच जर आरोप प्रत्यारोप सुरू राहिले तर जनतेचा राजकारण्यांवर विश्वास राहणार नाही.
राष्ट्रवादी कॉग्रेसचे दोन दिवसीय अभ्यास शिबिर: महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्यावतीने ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी शिर्डी येथे राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसाठी 'राष्ट्रवादी मंथन : वेध भविष्याचा' या दोन दिवसीय अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे वर्तमान स्थितीसंदर्भातील आकलन वाढावे, भविष्यातील आव्हानांचा वेध घेण्यासाठी त्यांनी सज्ज व्हावे आणि राष्ट्र तसेच समाजाबद्दलची बांधिलकी भक्कम व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या शिबिरामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्यातील विविध क्षेत्रातील विचारवंत, अभ्यासक मार्गदर्शन करणार आहेत.
अब्दुल सत्तारांवर ताशेरे: कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या विधानाबाबत अजित पवार म्हणाले की, आज सत्ताधारी पक्षातील लोकचं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. राज्यातील मंत्र्यांना काय बोलावं, काय बोलू नये याचे देखील भान नाही आहे. मी अनेक वर्षे प्रशासनात काम केलं आहे, पण कधीही अधिकाऱ्याला विचारलं नाही की दारु पिता का? असा मंत्री राज्याने कधीही बघितला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राज्यातील मंत्र्यांना मार्गदर्शन करावे की राज्यात कशा पद्धतीने अधिकाऱ्यांशी बोलावं. आपण 13 कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करत आहोत, असे देखील पवार म्हणाले.
सरकारने शिधा वाटपाचा गाजर दाखवला: शिधा वाटपावरून पवार म्हणाले की, या सरकारने जनतेला 100 रुपयात आनंदाचा शिधा वाटपाचा गाजर दाखवला. दिवाळीत 1 किलो रवा, 1 किलो साखर, 1 किलो डाळ आणि 1 किलो तेल मिळणार होतं. पण कुठे तेल मिळालं? कुठे साखर मिळाली? काहींना तर अर्ध साहित्य मिळालं. काहीना तर काहीच मिळालं नाही. या सरकार मधील एका नेत्याने तुळशीच्या लग्नापर्यंत दिवाळी असते तो पर्यंत देऊ, अश्या पद्धतीने थट्टा उडवली आहे, अशी टीका देखील यावेळी पवार यांनी केली.
ओला दुष्काळ जाहीर करा: आमचे सरकार असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे विरोधी पक्षनेते होते. यावेळी त्यांनी 16 ऑक्टोबर रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना परतीच्या पावसाने मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली होती. आता ते सत्तेत असताना त्यांनी यावर काही तरी उपाय करावा असे पवार यावेळी म्हणाले.
नोटांची चर्चा लक्ष विचलित करण्यासाठी: अरविद केजरीवाल यांच्या मागणीनंतर देशभरात चलनी नोटेवरील फोटोवरून गदारोळ होतो आहे. याबाबतीत अजित पवार म्हणाले की, देशात नोटांबाबत जे सुरू आहे अशी चर्चा आपण 75 वर्षात कधीच ऐकली नाही. घसरत्या अर्थव्यवस्थेपासून लक्ष विचलित करण्यासाठी हे सर्व चालू आहे. नोटेवर लक्ष्मी आणि गणपती चे चित्र हे कुणाला तरी पटतंय का? आज प्रश्न काय आहेत? लोकांना मदत करणे महत्वाचे आहे, असे देखील पवार यावेळी म्हणाले.