पुणे :आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. आज राष्ट्रवादीचा 24 वा वर्धापनदिन होता. याचे निमित्त साधून शरद पवारांनी जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल व खासदार सुप्रिया सुळे यांना पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याचे जाहीर केले. मात्र यावेळी त्यांनी अजित पवार यांना कोणतीच जबाबदारी दिली नाही. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. यावर आता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'मी अत्यंत समाधानी असून कारण नसताना कोणीही अफवा पसरू नये. मी नाराज नाही', असे अजित पवार म्हणाले.
'मला महाराष्ट्राच्या राजकारणात इंटरेस्ट' :सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्तीबाबत अजित पवार म्हणाले की, 'जेव्हा शरद पवारांनी राजीनामा दिला तेव्हा एक कमिटी स्थापन करण्यात आली होती. त्या कमिटीत 15 ते 17 जण होते. तेव्हा आम्ही दोन निर्णय घेतले होते. पहिला निर्णय म्हणजे शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, आणि दुसरा निर्णय म्हणजे कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात यावी. मात्र तेव्हा फक्त शरद पवारांनी राजीनामा परत घेण्याचे ठरले.' शरद पवारांनी यावेळी अजित पवार यांना मात्र कोणतीही जबाबदारी दिली नाही. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, माझ्यावर राज्याच्या विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी आहे. मी ही जबाबदारी चोखपणे पार पाडत आहे. मला नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणात इंटरेस्ट आहे.