उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस पुणे : महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांना त्रास देणाऱ्या काही लोकांची संख्या वाढलेली आहे. राजकीय ब्लॅकमेलर्सवर यापुढे कारवाई केली जाईल. कुणालाही सोडणार नाही. गुंतवणूक येताना गुंतवणूकदारांना धमकवणे हे आता सरकार सहन करणार नाही. तसे आदेशच आता मी पोलिसांना दिलेले आहेत. जर पोलिसांनी कारवाई नाही केली तर पोलिसांवर कारवाई केली जाईल. माथाडी संघटना, माथाडी नेते, कुठलाही राजकीय पक्ष-धर्म-जात न बघता त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना दिली आहे.
सहाशे कोटी रुपयांची गुंतवणूक कर्नाटकात गेली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते पुण्यातील येरवडा भागांमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी राजे महाराज उड्डाणपूलाचे उद्घाटन करण्यात आले. विविध विकास कामाचे उद्घाटन सुद्धा त्यांच्या हस्ते केल्यानंतर ते या कार्यक्रमात बोलताना असे म्हणाले की, आजच माझे एका उद्योजकासोबत बोलणे झाले. त्यांनी सांगितले की आम्ही सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक पुण्यात करणार होतो. मात्र, काही धमक्या आल्या. त्यामुळे आम्ही ती गुंतवणूक कर्नाटकात केली. अशामुळे पुण्याचा विकास थांबणार आहे. पुण्यात आशा ज्या प्रवृत्ती आहेत त्यांच्यावर कारवाई करा, मी त्यांना सोडणार नाही. यापुढे असले ब्लॅकमेलिंग चालणार नाही. पोलिसांनी कारवाई नाही केली तर पोलिसांवर सुद्धा सरकार कारवाई करेल, असा सज्जड दम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आज पुण्यात दिलेला आहे.
विकासाच्या आड येणाऱ्यांना सोडणार नाही : गेल्या अडीच वर्षात पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कामे झाले नाहीत. परंतु महानगरपालिकेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पुण्याला एक जागतिक शहर करायचे आहे. पुणे माहिती तंत्रज्ञान आणि इन्फ्रास्ट्रक्चरचे मोठे शहर म्हणून पुढे येत असताना काही लोक गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांना धमकावतात, टक्केवारी मागतात, खोट्या माथाडी संघटना तयार करतात, त्या सर्वांना कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिलेले आहेत. पुण्याच्या विकासाच्या आड येणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. असे सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी म्हटले आहे.
दोन हजार कोटीचा निधी दिला जाईल :पुण्यावर माझे आणि मुख्यमंत्र्यांचे विशेष लक्ष आहे. केंद्रातून सुद्धा माननीय पंतप्रधानांनी मेट्रो प्रकल्पाला त्वरित मंजुरी देऊन पुण्याला दोन नंबरचे रेकॉर्ड ब्रेक काम करणारे शहर म्हणून ओळख दिली. त्यामुळे शहराचा विकास करणे ही या सरकारची प्राथमिकता आहे. त्यासाठी सरकारकडून काही कमी पडू दिला जाणार नाही. येणाऱ्या काळात दोन हजार कोटीचा निधी सुद्धा दिला जाईल. रिंग रोडच्या जो मार्ग आहे. तो तयार केला जाईल. त्या ठिकाणी एक इकॉनोमिक कॉरिडोर तयार होईल. त्याचा मोठा फायदा महाराष्ट्राला होईल. असे सगळे प्रस्ताव हे आमच्याकडे आलेले आहेत. आम्ही आमच्याकडे आमच्या वाटेला असलेला निधी तुमच्यापर्यंत पोहोचवू याची खात्री देतो. असे म्हणत त्याने पुण्यातील जनतेला सरकार विकासासाठी पूर्णपणे पुण्याच्या पाठीमागे असल्याचे सांगितले आहे.
अजित पवारांची प्रतिक्रिया :विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली असून जर तुम्हाला एवढी माहिती असेल तर ज्याने धमकावले त्याच्यावर मोक्का लावा. बोलून चालणार नाही राज्याच्या गृहमंत्र्यांना माहिती असेल तर त्याने कारवाई करावी. हे राज्याच्या हिताचे नाही. आपली गुंतवणूक बाहेर जाणार आहे. आपल्या मुलाबाळांना आपल्या युवकांना मिळणाऱ्या नोकऱ्या जर बाहेर जात असतील तर त्यावर जरूर कारवाई करा, असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एक प्रकारे देवेंद्र फडवणीस यांना आव्हान दिले आहे.
जिल्हा नियोजन मंडळाचा निधी :पुण्याला काहीही कमी करू देणार नाही असे देवेंद्र फडवणीस म्हणाल्यानंतर अजितदादा पवार यांनी पलटवार केला. पुण्यालाही कमी पडू देऊ नका, राज्यालाही कमी पडू देऊ नका, गेल्या सहा महिन्यात सरकार आले. परंतु जो जिल्हा नियोजन मंडळाचा निधी खर्च झाला नाही, तो का झाला नाही कोणामुळे रोखला हेही महाराष्ट्राला सांगा. असे म्हणत त्याने आमच्या काळात विकास झाला असे म्हणणे चुकीचे आहे, हे असेच एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांना सुनावले आहे. अजित पवार पुण्यामध्ये आज एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याला आले होते त्यावेळी बोलत होते.
हेही वाचा :Tata Mumbai Marathon : १८ व्या टाटा मुंबई मॅरेथॉनला सुरुवात; मोठ्या संख्येने धावपटूंचा सहभाग