पुणे -केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून वाशिम जिल्ह्यातील रस्ते कामांना शिवसेनेचे स्थानिक प्रतिनिधी विरोध करत आहेत. त्यामुळे या रस्त्यांची कामे रखडली असल्याचे सांगितले होते. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून नितीन गडकरी यांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे की नाही हे तपासून पाहावे लागेल, असे पवार यांनी सांगितले. अजित पवार यांनी आज (रविवारी) 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या, यावेळी ते बोलत होते.
नितीन गडकरींच्या आरोपात तथ्य आहे की नाही तपासावे लागेल अजित पवार म्हणाले, मागील तीस वर्षांपासून मी समाजकारणात काम करतोय, त्यामुळे मी नेहमी सांगतो की हा पैसा जनतेचा असतो. जनतेच्या पैशाचा विनियोग व्यवस्थित झाला पाहिजे, होणाऱ्या कामाचा दर्जा राखला पाहिजे. कामाचा दर्जा चांगला राखला जात नसेल तर संबंधित ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे. परंतु जर एखादा ठेकेदार चांगले काम करत असतानाही काही जण एखाद्या राजकीय पक्षाचा आधार घेऊन, मिळालेल्या पदाचा आधार घेऊन जर त्रास देत असेल तर तो ही त्रास ताबडतोब थांबवला गेला पाहिजे. या संदर्भातील पत्र आता थेट मुख्यमंत्र्यांनाच गेले आहे.
मागील पावणेदोन वर्षांपासून मी मुख्यमंत्र्यांसोबत काम करतोय. त्यांच्या कामाची पद्धत मला माहित आहे. कामाचा दर्जा चांगला राखण्यासाठी त्यांचा नेहमी कटाक्ष असतो असतो. अधिकाऱ्यांची बैठक होते तेव्हाही कामाचा दर्जा आणि वृक्षतोड कशी टाळता येईल यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात ते बारकाईने लक्ष घालतील, त्याची शहानिशा करतील याची मला शंभर टक्के खात्री आहे. परंतु, कुठल्याही कार्यकर्त्याने, पदाधिकाऱ्याने विकास कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करता कामा नये, असे अजित पवार यावेळी म्हणाले.
कधीकधी बिनबुडाचे आरोप देखील होत असतात, संजय राठोड प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया
कधीकधी बिनबुडाचे आरोप देखील होत असतात शिवसेनेचे आमदार आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर एका महिलेने केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांविषयी विचारले असता अजित पवार म्हणाले, अशा प्रकरणात चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर आली पाहिजे. कधीकधी बिनबुडाचे आरोप देखील होत असतात. सरकार चालवत असताना वेगवेगळे आरोप-प्रत्यारोप होत असतात.. काही आरोपात तथ्य असतं तर काही आरोपात तथ्य नसते. यापूर्वी जेव्हा आरोप झाले तेव्हा जोपर्यंत निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय संजय राठोड यांनी घेतला होता. त्याची चौकशी आता अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर आता हा दुसरा प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी संबंधित व्यक्तीची पोलीस विभागाकडून अडीच तास चौकशी देखील करण्यात आली आहे. त्या चौकशीतून खरी वस्तुस्थिती लोकांसमोर येईल.
आजचा दिवस आनंदाचा, अजित पवार यांनी दिल्या शुभेच्छा
75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशातील जनतेला दिल्या शुभेच्छा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. अजित पवार म्हणाले, बघता बघता पंच्याहत्तर वर्षे झाली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अनेक पिढ्यांचा योगदान आहे. आजवर देशाने प्रगती करण्याचा खूप प्रयत्न केला आहे. परंतु, देशासमोर अजूनही काही प्रश्न आहेत. दररोज नवनवीन प्रश्न निर्माण होत असतात. परंतु ते उगाळत बसण्याचा आजचा दिवस नाहीतर आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे.
देश एकसंघ ठेवण्याच्या दृष्टिकोनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिले आहे त्या संविधानाचा आदर करून त्या काळात देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महात्मा गांधींपासून ते अनेकांनी कशाचीही पर्वा न करता योगदान दिले आहे. अशाच वीरांचे स्मरण करून त्यांच्यापुढे नतमस्तक होण्याचा आजचा दिवस आहे, अश्या शब्दात त्यांनी जनतेला स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा -75वा स्वातंत्र्यदिवस : 100 लाख कोटींची पंतप्रधान गतीशक्ती योजना लाँच करणार; पंतप्रधानांचं प्रतिपादन