पुणे Ajit Pawar On contract Recruitment :राज्यातील कंत्राटी भरतीबाबत अकारण गैरसमज पसरवण्यात आला, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर केली. कंत्राटी भरतीचा निर्णय मागं घेतल्यानंतर ते आज माध्यमांशी बोलत होते. तसंच यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अगोदर कुणाच्या काळात कशा पद्धतीनं नोकर भरती झाली याविषयी काल पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली आहे. त्यातून वस्तुस्थिती समोर आली. आपल्या सरकारच्या काळात दीड लाख नोकर भरतीचा निर्णय घेण्यात आला असून याआधी एवढ्या मोठी भरती कोणत्याच सरकारच्या काळात झाली नसल्याचंही अजित पवार यावेळी म्हणाले.
माफी कोणी मागायची हे विरोधकांनी ठरवावं :आमच्या सरकारच्या काळात दीड लाख नोकर भरती आम्ही करत आहोत. कंत्राट भरतीचा निर्णय कुठल्या मुख्यमंत्र्यांच्या काळात कधी कसा निघाला, हे सगळं सांगितलेलं आहे. मी देखील सुधाकरराव नाईक यांच्या काळापासून काम करतोय. त्यामुळं मलाही चांगली माहिती आहे. त्यामुळं आता माफी कोणी मागायची हे विरोधकांनी ठरवायचंय. आर आर पाटील यांच्या काळात 65 हजार भरती आम्ही केली होती. त्यानंतर ही सगळ्यात मोठी भरती असल्याचंही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.