पुणे : राष्ट्रवादीत फूट पडली असून राज्यातील काही नेते, आमदार, कार्यकर्ते अजित पवार यांच्या पाठीशी असल्याचे दिसून येत आहे. तर काहीजण शरद पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. राज्यातील राजकीय भूकंपानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे. अजित पवार यांच्या गटाने रुपाली चाकणकरांना महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. मागील 15 महिन्यांपासून मला दूर ठेवले गेले. त्यामुळे माझी भूमिका बदलली, असे चाकणकर म्हणाल्या. चाकणकर आज पुण्यात आल्या असता पत्रकारांशी संवाद साधत होत्या.
पक्षापासून दूर ठेवण्यात आले :यावेळी रुपाली चाकणकर म्हणाल्या की, गेल्या 18 ते 19 वर्षांपासून पक्षात काम करत आहे. रस्त्यावरचे आंदोलन असो की, भाजप विरोधात मी नेहमीच पक्षासाठी काम केले आहे. पण गेले 15 महिने माझ्यासाठी खूप कठीण काळ होता. आत्ता अजित पवारांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्षाचे पाठबळ दिले आहे. आगामी काळात महिला मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पक्ष प्रयत्न करणार असल्याची माहिती चाकणकर यांनी दिली. तसेच, त्या पुढे म्हणाल्या की, यापूर्वीच्या सर्व 8 महिला अध्यक्षांनी पक्षवाढीसह आयोगाचे काम केले आहे. मात्र, मला राष्ट्रवादी पक्षापासून दूर ठेवण्यात आले, असा आरोप चाकरणकर यांनी केला आहे.