पुणे - काही दिवसांपूर्वी सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राष्ट्रवादीच्या महत्वाच्या बैठकीतून अजित पवार नाराज होवून निघून गेल्याची बातमी आली होती. बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा ५८ व्या गव्हाण पूजन आणि गळीत हंगाम कार्यक्रम अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी याबाबतचा खुलासा केला आहे.
आता येथून पुढे 'नो कमेंन्टस' - अजित पवार हेही वाचा - काँग्रेससोबत चर्चा करुन लवकरच पर्यायी सरकार स्थापन करणार - नवाब मलिक
पवार म्हणाले, की सत्तास्थापनेच्या पेच प्रसंगावर चर्चा करण्यासाठी आम्ही ज्या ठिकाणी बैठक घेणार होतो, त्याठिकाणी सर्वसामान्यांना त्रास होत असल्यामुळे आम्ही अज्ञातस्थळी बैठक घेण्याचे ठरविले. त्यावेळी मी गाडीतून निघालो असता पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर मी सहज बारामतीला निघालो असे बोललो. पण माध्यमातून याचा विपर्यास करून अजित पवार नाराज होऊन बारामतीला परतले निघाल्याचे सांगितले. तेव्हापासून मी कानाला खडा लावात ठरवले आहे, की काहीच न बोलता 'नो कॉमेंट्स' म्हणून पुढे निघायचे.
हेही वाचा - जनतेच्या मनातील सरकार आणण्यासाठी पवारसाहेबांचा प्रयत्न - जयंत पाटील
बारामतीच्या मतदारांनी सातव्यांदा विधानसभेत निवडून दिल्याबद्दल अजित पवारांनी खास आपल्या शैलीत मतदारांचे आभार मानत मतदारांना साष्टांग नमस्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. पवार पुढे म्हणाले, की महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासासाठी या वयात पवार साहेबांनी महाराष्ट्र पिंजून काढला. पवार साहेबांच्या बाबतीत नको त्या गोष्टी करण्याचा झालेला प्रयत्न आणि साहेबांना काढलेली ईडीची नोटीस हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला रुचले नाही म्हणूनच महाराष्ट्रात पहिल्यांदा असा निकाल लागला की बहुमत असणाऱ्यांच्या नाराजी तर अल्पमतात असणाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. राष्ट्रवादीचे अनेक नवनिर्वाचित आमदारांना बळजबरीने तिकिटे दिली. सुरुवातीला काय होईल माहिती नव्हते. मात्र, पवार साहेबांच्या झंझावाती प्रचारामुळे ते सर्व आमदार झाले, असेही पवार यांनी सांगितले.