पुणे -महाविकास आघाडीचा लांबलेला मंत्रीमंडळ विस्तार आज पार पडला. २८ तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह केवळ ६ मंत्र्यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर तब्बल महिन्यानंतर आज मंत्रीमंळाचा विस्तार झाला. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बारामतीत फटाके फोडून जोरदार जल्लोष करण्यात आला.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानतंर कोणाला कोणते मंत्रीपद मिळणार, याबाबत सर्वच जण आपआपल्या पद्धतीने कयास बांधत होते. मात्र, त्याचवेळी बारामतीला कोणते मंत्रीपद मिळणार याची कमालीची उत्सुकता होती. आज अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद मिळाले असून, बारामतीकरांच्यात उत्साहाचे वातावरण आहे.
अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी, बारामतीत जोरदार जल्लोष १४ व्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानतंर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. महाराष्ट्रात प्रथमच ३ पक्ष एकत्र येत ऐतिहासिक महाविकास आघाडी स्थापन होऊन सरकार स्थापन झाले. मात्र, त्यापूर्वी अजित पवारांनी सत्ता स्थापनेची बोलणी सुरू असताना तिन्ही पक्षात एकवाक्यता नसल्याच्या कारणावरुन अचानक भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन राज्याच्या राजकारणात भुकंप घडवून आणला होता.
अजित पवार यांनी त्यावेळी घेतलेल्या निर्णयामुळे बारामतीकरांच्या मनात व्दिदा मनस्थितीत निर्माण झाली होती. काही बारामतीकारांनी अजित पवारांच्या निर्णयाचे स्वागत केले होते. तर काही शरद पवार यांचे समर्थन करत होते. राज्यभरात या निर्णयाची साधकबाधक चर्चा झाल्यानतंर उपमुख्यमंत्रीपदाचा राजीमाना देवून अजित पवार पुन्हा आघाडीत सामील झाले. त्यानतंर नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये मुख्यमंत्री पदासह ६ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती.
आज मंत्रीमंडळात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बारामतीत कार्यकर्त्यांनी एकच वादा अजित दादा, एकच साहेब पवार साहेब, अशी घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी भवनसह शहरातील प्रमुख चौका-चौकात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
बारामतीकरांची इच्छापूर्ण..
अजित पवारांना कोणते मंत्रीपद मिळणार याची उत्सुकता आज अखेर संपली. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि बारामतीकरांची इच्छा पूर्ण झाली. बारामतीकरांनी अजित पवारांना सर्वाधिक मताने निवडून दिले आहे. विधानसभेच्या निकालानंतर झालेल्या राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे सरकार स्थापन झाले. हे समीकरण जुळून आल्यापासूनच राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनाच संधी मिळणार असा अंदाज बांधला जात होता. बारामतीकरांची इच्छाही तीच होती. आज शपथविधी पूर्ण झाला. अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद मिळावे अशी इच्छा बारामतीकरांची होती ती पूर्ण झाली.