बारामती -सरकार पाडण्यासाठी गेली वर्षभर काही लोक साम-दाम दंड नीतीचा अवलंब करून काम करत होती. एका बाजूला काही जण म्हणतात की, सरकार पाडण्यात आमचा काही संबंध नाही. मात्र, एका महत्त्वाच्या नेत्याच्या धर्मपत्नीनेच सांगितले की, माझा पती वेश बदलून रात्री अनेकदा इतरांना भेटायला जायचे यातूनच बंड झाले. महाराष्ट्राच्या राजकारणात अशा गोष्टी घडत नव्हत्या. असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाव न घेता निशाणा साधला. विरोधी पक्ष नेते अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. सकाळपासूनच त्यांनी बारामतीतील विविध विकास कामांची पाहणी केली. नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात येथील राष्ट्रवादी भवन कार्यालयात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते.
सुप्रीम कोर्टाच्यानिकालाकडे सर्वांचे लक्ष -11 तारखेला होणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्यानिकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने चांगले चांगले वकील देऊन आपली भूमिका कशी योग्य आहे हे सांगण्याचे काम करणार आहे. मात्र एक गोष्ट खरी आहे की, आत्ताचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये धाकधूक असल्यामुळे त्यांनी स्वतःचीच मंत्री पदाची शपथ घेतली आहे. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार केला नाही. पक्षांतर्गत संबंधात ज्या काही गोष्टी मध्यंतरी करण्यात आल्या. इतर राज्यात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर तेथील निकाल काय लागले. हे पाहिले असता फार वेगळे निकाल लागल्याचे दिसून येते. असे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारामतीत केले.