बारामती : नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देणारी अधिकारी व्यक्तीच जर नियम मोडत असेल, तर कसे चालेल. असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या रात्री उशिरापर्यंत होत असणाऱ्या दौऱ्यांबाबत विरोधी पक्ष नेते अजित पवारयांनी ( Opposition Leader Ajit Pawar ) टीका केली. याबाबत पवार म्हणाले की, आम्ही जेव्हा पदावर असतो तेव्हा आम्ही नियम मोडून चालत नाही. आम्ही ज्यावेळी तुम्हाला सांगतो नियमात वागा, रात्री दहाच्या पुढे लाऊड स्पीकर बंद. मात्र, मुख्यमंत्रीफिरत असताना रात्री एक-दोन वाजेपर्यंत स्पीकर चालू असतात. ( Saibachiwadi in Baramati Taluka )
पोलिसांना आदेश देणारे आदेश मोडत असतील तर.... : पोलिसांना सांगावं तर पोलिसांना आदेश देणारेच नियम मोडत असतील, तर पोलीस तरी काय करणार. आम्ही पोलिसांना विचारले तर ते म्हणतात, दादा आमच्या घड्याळात अजून दहा वाजलेच नाही. त्यांच्याकडे दुसरे उत्तरही नाही. पोलीस तरी कसे म्हणू शकतील, रात्री दीड वाजला तरी मुख्यमंत्री बोलतात. त्यात आम्ही काय करायचो, तर व्हायची बदली, अशी पोलिसांची अवस्था.
राज्यपालांनासुद्धा दिली माहिती : याबाबत मी राज्यपालांना बोललो, आपल्याकडे अधिकार आहे. आपण याबाबत बोला! प्रत्येकाला आपला पक्ष, गट वाढवण्याचे अधिकार आहे. मात्र, संविधानाने सांगितलेल्या अधिकाराप्रमाणे त्याचे पालन केले पाहिजे. मग ती सामान्य व्यक्ती असो की उच्चपदस्थ, असे म्हणत रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या दौऱ्यांबाबत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आपले मत व्यक्त केले.
सत्ताधारी नेत्यांवर साधला निशाणा : विरोधी पक्ष नेते अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. बारामती तालुक्यातील सायबाचीवाडी येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पवार बोलत होते. थेट जनतेतून सरपंच व नगराध्यक्ष करताय तर राज्याचा मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधानही थेट जनतेतून निवडा. ठराविक लोकांना अधिकार आहे आणि ठराविक लोकांना नाही हे वागणं बरोबर नव्हे, अशी खिल्ली उडवत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
मंत्रिमंडळ विस्तारावर घेतला खरपूस समाचार : पुढे बोलताना पवार म्हणाले की, तुमच्यात फोडाफोडी करणार आणि त्यातून इकडून तिकडे जाणार आणि आता आमचे 145 पेक्षा जास्त बहुमत झाले. आता आमचा मुख्यमंत्री खरंतर या संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी होती. कोर्टाने त्याबाबत आपले म्हणणे मांडले आहे. कदाचित याबाबत निकाल काय लागेल माहिती नसल्याने मंत्रिमंडळ विस्तार होत नाही की काय, अशी शंका येत असल्याचे सांगितले. बंड केलेल्या आमदारांनाही तुम्हाला मंत्री करतो, असे सांगितले असावे. म्हणूनसुद्धा विस्तार होत नसेल. त्यामुळे कोणाला मंत्री, कोणाला राज्यमंत्री तर भाजपच्या ही 106 आमदारांना वाटतं की, आपल्यालाही मंत्रिपद मिळायला पाहिजे. एक तर त्यांना मुख्यमंत्रीपद नसल्यामुळे त्यांच्या आमदारांचे चेहरे इतके पडले की, न सांगितलेलं बरे असे पवार म्हणाले.
प्रत्येक निर्णयाला स्थगिती देण्याचे काम या सरकारने केले :मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे दोघेच राज्याचा कारभार करीत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक विकासकामे ठप्प झाली आहेत. या दोघांवर इतका भार आला आहे की, मुख्यमंत्री आजारी पडायला लागले आहेत. हे मी चांगल्या भावनेने म्हणतोय. यात कोणतेही राजकारण नाही. हेच काम जर मंत्रिमंडळाचा विस्तार केला असता, तर कामाची वाटणी झाली असती. जो तो मंत्री आपापल्या भागात काम करत राहिले असते. पूर परिस्थितीच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी सचिवांना सांगितले असता ते म्हणतात आम्हाला आदेश पाहिजे. मात्र आदेश देणाऱ्या सर्व खात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही अद्याप कुठलेही खाते नाही. सरकार येत असतं जात असतं. मात्र विकास कामे सुरूच असतात. मात्र हे दोघे सरकारमध्ये आल्यानंतर त्यांनी जनहिताच्या प्रत्येक निर्णयाला स्थगिती देण्याचे काम या सरकारने केले आहे. अशी टीका विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सरकारवर केली.
हेही वाचा :Bhaskar Jadhav Strongly Criticized on Government : बिनखात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व निर्णय एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भाजपचा कार्यक्रम असल्यासारखे राबवत आहेत - आमदार भास्कर जाधव यांचा टोला