पुणे - जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील कोल्हेमळा येथे जमीन खरेदी विक्री करणाऱ्या एजंटवर कोयत्याने वार करत प्राणघातक हल्ला झाला आहे. ही धक्कादायक घटना आज दुपारच्या सुमारास घडली असून, हा हल्ला जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारातून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. संग्राम जग्गनाथ घोडेकर, असे जखमी एजंटचे नाव आहे.
हेही वाचा -मेट्रोने मुळा नदीतील काम थांबवावे, अन्यथा पूर परिस्थितीची शक्यता - मनसे
आज दुपारच्या सुमारास संग्राम घोडेकर घरगुती गॅस घेऊन कोल्हेमळा येथून घराच्या दिशेने जात होते. दरम्यान, पाठीमागून दुचाकीवरून जाणाऱ्या तीन जणांनी घोडेकर यांच्यावर कोयत्याने वार केले व त्यांना गंभीर जखमी करून फरार झाले. दरम्यान, स्थानिकांच्या मदतीने संग्राम घोडेकर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.