पुणे : पुण्याचे भाजपाचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा निवडणुकीची राज्यात सध्या चर्चा चालू आहे. निवडणुका कधी लागणार, निवडणूक आयोग कधी जाहीर करणार हे लांब असताना इच्छुक उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते यांना मात्र संयम दिसत नाही. पुण्यात बापट यांचे निधन झाल्यानंतर तीन दिवसातच भाजपाच्या शहराध्यक्षाचे मुळीक यांचे भावी खासदार म्हणून बॅनर लागले होते. त्यानंतर सर्व स्तरातून टीका झाल्यानंतर ते बॅनर काढण्यात आले. आम्ही आणखी दुःखातून बाहेर आलो नाही अशी प्रतिक्रियासुद्धा भाजपाकडून देण्यात आली होती.
प्रशांत जगताप यांचे बॅनर -आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडूनसुद्धा असे पोस्ट शहरात लावण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे बॅनर लागले आहेत. प्रशांत जगताप मित्र परिवार असा उल्लेख या बॅनरच्या खाली आहे. भाजपाच्या बॅनरबाजीवरून जोरदार टीका करणारे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आता त्यांच्याच बॅनरवर काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्याच वेळेस राष्ट्रवादीकडून विरोधी पक्ष नेते अजित पवार खासदार सुप्रिया सुळे यांनीसुद्धा आपण माणुसकी संवेदनशीलता जपूया दहा-पंधरा दिवस झाल्यानंतर, ज्यावेळेस निवडणुका जाहीर होणार. त्यावेळेस त्याची चर्चा करूया, आताच कोणी गुडघ्याला बाशिंग बांधू नये, असा सल्लासुद्धा काँग्रेसला दिला होता. त्यामुळे त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून असे बॅनर लागल्याने आता याची चर्चा होत आहे.